18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

विशेष लेख : कसाब म्हणाला, ‘कैसी हो मॅडम?’

२६/११ च्या खटल्याचे दैनंदिन वृत्तांकन करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली गेली, तो दिवस म्हणजे माझ्यासाठी

प्राजक्ता कदम - prajushaiv@gmail.com | Updated: November 21, 2012 3:34 AM

२६/११ च्या खटल्याचे दैनंदिन वृत्तांकन करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली गेली, तो दिवस म्हणजे माझ्यासाठी आव्हानात्मक प्रवासाची सुरुवात होती. हे वृत्तांकन करणे आपल्याला जमेल का, ही धाकधूक बाळगून सुरू केलेल्या या कामात पुढे पुढे मी रमत गेले, समरसून गेले, आणि सरावलेही. त्या २५३ दिवसांतील अनुभवांचे हे प्रांजळ कथन-
२६/११ चे क्रौर्य मी जवळून पाहिले होते. अगदी ट्रायडंट हॉटेलच्या लॉबीत टाकल्या गेलेल्या हॅंडग्रेनेडचा उद्रेक मी अनुभवला होता. आमचे कार्यालय ट्रायडंट हॉटेलच्या अगदी समोरच्याच  इमारतीत असल्याने  आमच्या इमारतीचा पार्किंग लॉट म्हणजे जणू ‘न्यूज रूम’ झाली होती.
ट्रायडंट हॉटेलमधून झडणाऱ्या गोळ्यांच्या फैरींचा भयावह आवाज, रक्ताची थारोळी, बळींच्या करुण कहाण्या, ट्रायडंटमध्ये अडकलेल्यांची कालांतराने झालेली सुटका.. हे सारे रिपोर्टर या नात्याने जवळून पाहिले, अनुभवले होते.  त्यातही माझे लक्ष होते, गिरगाव पोलिसांनी जिवंत पकडलेल्या ‘त्या’ दहशतवाद्याचे पुढे काय होते, याकडे. कारण तेव्हा मी ‘क्राइम बीट’वर होते. पुढे बरेच दिवस या दहशतवादी हल्ल्याचे वृत्तांकन मी ‘क्राइम रिपोर्टर’च्या भूमिकेतून करत होते. रिपोर्टिग करत असताना कसाब आणि त्याच्या गॅंगबद्दल प्रचंड राग मनात दाटलेला असे. त्याच्यावर कडक कारवाई करण्याइतके पुरावे पोलीस यंत्रणा जमवू शकेल ना, त्याला लवकरात लवकर जबर शिक्षा होईल ना, याबद्दलची साशंकता (की काळजी?) मनात अनेकदा दाटून येई.
    आणि अचानक एके दिवशी २६/११ च्या खटल्याचे दैनंदिन वृत्तांकन करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली. अर्थात् ही किती मोठी संधी आहे,  ही कल्पनाही तेव्हा माझ्या मनाला स्पर्शून गेली नव्हती, इतकी मी त्या आदेशाने गांगरून गेले होते. हे काम मला जमेल, याची खात्रीच वाटत नव्हती. एवढी मोठी जबाबदारी मी पेलू शकेन, हा आत्मविश्वासही तेव्हा माझ्या ठायी नव्हता. त्या दिवसापासून ते कसाबला फाशीची शिक्षा ठोठावण्याच्या न्यायालयाच्या निर्णयापर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम मोठा विलक्षण आहे. या पूर्ण खटल्याशी, न्यायालयातील प्रत्येक घटनेशी, आर्थर रोड तुरुंगाच्या त्या वास्तूशी माझे एक आगळे नाते यादरम्यान जडले. ज्या कसाबकडे मी तीव्र संतापाने पाहायचे, तोही खटल्याच्या या दीर्घ वाटचालीत मला  ओळखू लागला होता.
तसे कोर्ट रिपोर्टिग काही माझ्यासाठी नवीन नव्हते. माझ्या पत्रकारितेच्या पेशाची सुरुवातच मी ‘कोर्ट रिपोर्टिग’ने केली होती. दोन वर्षांच्या कोर्ट रिपोर्टिगचा अनुभव गाठीशी बांधून मी ‘लोकसत्ता’मध्ये प्रवेश केला होता. मात्र, ‘लोकसत्ता’त आल्यानंतर माझ्याकडे सुरुवातीला क्राइम बीट देण्यात आले. आणि दीड वर्षांच्या क्राइम रिपोर्टिगच्या ‘गॅप’नंतर कसाब खटल्याच्या निमित्ताने मला पुन्हा एकदा कोर्ट रिपोर्टिग करण्याची संधी मिळत होती. त्यातही अजित गोगटे यांच्यासारखे कोर्ट रिपोर्टिगमधील दिग्गज ज्येष्ठ प्रतिनिधी ‘लोकसत्ता’मध्ये असल्याने त्यांच्यासारखे ‘लोकसत्ता-स्टॅण्डर्ड’चे कोर्ट रिपोर्टिग मी करू शकेन का, या आशंकेने मला ग्रासले होते. त्यावेळी कसाब खटल्यासाठी प्रत्येक वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या केवळ दोनच प्रतिनिधींना प्रवेशपास देण्यात येतील, असे गुन्हे अन्वेषण विभागाने जाहीर केल्यानंतर आमच्याकडून कोर्ट रिपोर्टिग करण्यासाठी माझ्या वरिष्ठांचे आणि माझे नाव देण्यात आले. अर्थात माझे नाव पर्यायी म्हणूनच देण्यात आले होते. पण पास घेऊन जेव्हा मी माझ्या वरिष्ठांकडे गेले, तेव्हा त्यांनी मला, ‘कसाब खटला तुलाच कव्हर करायचा आहे, माझा प्रवेशपास तयार असला तरी मी तिकडे ढुंकूनही पाहणार नाही. त्यामुळे तुलाच त्याला फासावर लटकवायचे काम करायचे आहे,’ असे फर्मानच काढले. ‘तुमच्यासारख्या नवीन मुलांना अशाच खटल्यांतून शिकायला मिळते. मग घे ना हा अनुभव!,’ अशी वर पुस्तीही जोडली.
भीतीच्या सावटाखाली मी, सुनावणीच्या पहिल्या दिवशी आर्थर रोड कारागृहातील न्यायालयाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचले. १५ एप्रिल २००९ हा तो दिवस. खटल्याची सुनावणी सकाळी ११ वाजता सुरू होणार होती. त्यामुळे त्याच्या दोन-तीन तास आधीच दुनियाभरचा मीडिया तिथे गर्दी करणार, हे लक्षात घेऊन मी सकाळी नऊ-सव्वानऊलाच तेथे पोहोचले. आणि मग हाच सिलसिला सुरू राहिला. रोज काहीही करून सकाळी ११ च्या आत कोर्टात पोहोचायचेच, हा दंडक मी स्वत:ला घालून घेतला.
दीड वर्षांच्या खंडानंतर यानिमित्ताने पुन्हा मी न्यायालयीन पत्रकारांच्या वर्तुळात गेले होते. ‘अरे, तू पुन्हा कोर्टात? तुला पाठवलं वाटतं? तूच करणार का ट्रायल कव्हर?’ म्हणत माझे काही जुने सहकारी भेटले. जरा बरे वाटले. पण मनातली धाकधूक काही संपली नव्हती. मध्यंतरीच्या काळात या कोणाशीच संपर्कात नसल्याने काहीशी बुजल्यासारखी अवस्था झाली होती माझी.
याच न्यायालयात १९९३ चा बॉम्बस्फोट मालिका खटला चालविण्यात आला होता. मी त्या खटल्याच्या निकालाच्या वेळची सुनावणी कव्हर केली होती. त्यामुळे त्यावेळचे न्यायालय, त्याची दुर्दशा, तेथील कंटाळवाणे कामकाज डोळ्यांसमोर तरळले. अरे बापरे! त्याच वातावरणात आपल्याला याही खटल्याचे रिपोर्टिग करायचे आहे, हा विचार मनात येऊन अंगावर शहारा आला.  
रोज सकाळी सव्वादहाच्या सुमारास आम्हाला न्यायालयाच्या आत सोडण्यास येई. प्रवेशद्वारापाशी बॅग, कार्यालयीन ओळखपत्र, खटल्यासाठी दिले गेलेले ओळखपत्र यांची कसून तपासणी होई. नंतर- ‘केवळ नोटपॅड आतमध्ये घेऊन जाऊ शकता, उर्वरित सामान येथे जमा करा,’ असे आदेश आम्हाला दिले गेले. त्यामुळे सामान पोलिसांकडे जमा करून नोटपॅड आणि पेन (अर्थात पोलिसांनी दिलेले!) घेऊन मी दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले. गर्दी आणि गोंधळ नको म्हणून प्रत्येक दोन पत्रकारांमध्ये अंतर ठेवण्यात आले होते. दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ खटल्यासाठीच्या पासाचे पंचिंग केल्यानंतर एका खोलीत नेले जाई. दोन महिला पोलिसांकडून नोटपॅड आणि पोलिसांनीच दिलेल्या पेनाचीही कसून तपासणी होई. ‘चप्पल काढा, केस सोडून दाखवा,’ असे फर्मावून आमची झडती घेतली जाई.
पहिल्या दिवशी या झडतीकडे दुर्लक्ष करून मी तिसऱ्या प्रवेशद्वाराजवळ – म्हणजे कसाबच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या इंडो-तिबेटीयन सीमा पोलिसांच्या (आयटीबीपी) प्रवेशद्वाराजवळ पोहोचले. तेथे नावाची नोंद केल्यानंतर आणि त्यांनी दिलेला आणखी एक पास घेऊन चौथे प्रवेशद्वार पार केले. न्यायालयापर्यंत जायच्या त्या संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी हे बंदुकधारी जवान तैनात होते. पुढे एक छोटेखानी दरवाजा होता. त्यातून न्यायालयाच्या आत जाण्याचा मार्ग होता. खरे तर कसाबला तुरुंगातून न्यायालयात नेण्यासाठी तो निमुळता, विस्फोटक प्रतिबंधित ‘टनेल’ तयार करण्यात आलेला होता. तेथून न्यायालय अगदी काही पावलांवर होते. मात्र, तेथेही पोलिसांकडून तपासणी केली जाई. तपासणीचे हे दिव्य पाच वेळा पार केल्यानंतर एकदाचा त्या वातानुकूलित न्यायालयात प्रवेश मिळे. यावेळी तेथे पत्रकारांना बसण्यासाठी आरामदायी खुच्र्या ठेवण्यात आलेल्या होत्या. ते ‘कूल’ वातावरण  बघून एकदम हुश्श वाटले! हळूहळू न्यायालयातील गर्दी वाढू लागली. खुच्र्या अपुऱ्या पडू लागल्या.
१५ एप्रिल २००९  रोजी बरोब्बर ११ वाजता खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली आणि न्यायालयाने कसाबसह फहीम आणि सबाउद्दीन या दोन आरोपींना आणण्याचे आदेश दिले. कसाबला नेहमी पुढून आणले जायचे. पण पहिल्या दिवशी त्याला आमच्यातून नेण्यात आले आणि सगळ्या पत्रकारांची त्याला पाहण्यासाठी झुंबड उडाली. त्याने काय घातले आहे, तो कसा दिसतो, याची वर्णने नोटपॅडमध्ये उतरवली जाऊ लागली. अर्थात मीही त्यात होतेच. काही वेळ नि:शब्द शांतता होती. पण त्यानंतर त्याच्या दिसण्याबाबतची कुजबूज सुरू झाली. ‘हा तर बुटबैंगण! या देडफुटय़ाने केले हे कृत्य?’ अशी विशेषणे काहीजण त्याला लावत असतानाच दुसरीकडे ‘क्यूट दिसतो ना!’ असेही शेरे कानी पडत होते. तर काहीजण ‘ठार मारावेसे वाटतेय याला!’, असा संताप व्यक्त करीत होते. थोडक्यात- पहिला दिवस कसाब-वर्णनातच गेला. तशातच या कसाबपुराणाला पहिल्याच दिवशी त्याच्या वकील अंजली वाघमारे यांच्या खोटे बोलण्याप्रकरणी झालेल्या हकालपट्टीची फोडणी मिळाली आणि आम्हा पत्रकारांना खुमासदार बातमी मिळाल्याने तो दिवस सार्थकी लागला. पुढचे काही दिवस आम्ही कसाबची निरीक्षणे करायचो. तो काय प्रतिक्रिया देतो, तो काही पुटपुटतो का, याचा कानोसा घेण्यासाठी आमचे त्याच्याकडे बारकाईने लक्ष असे.
एक जरूर सांगावेसे वाटते. या खटल्यात आम्ही जे जे काही शिकलो, त्यातील काही धडे तर थेट न्या. टहलियानी यांच्याकडून मिळाले. त्यांनी चक्क आमची ‘पाठशाळा’ घेतली. पहिल्या काही दिवसांतील वृत्ते वाचल्यानंतर न्या. टहलियानी यांनी आम्हाला बजावले- ‘कसाबला अतिरेकी महत्त्व देऊन तुम्ही त्याला ‘हिरो’ बनवत आहात. तसे करू नका. हा आंतरराष्ट्रीय खटला आहे. अत्यंत जबाबदारीने रिपोर्टिग करा.’
तसेही ते दिवस म्हणजे ‘बॅक टू स्कूल’ असा अनुभव होता. आम्ही तरुण पत्रकार मंडळी सकाळी न्यायालयात पोहोचल्यानंतर बेंचवरून भांडण करायचो,  लवकर जाऊन पहिल्या रांगेत बसण्यासाठी चढाओढ करायचो. ‘सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेचार- पाच : मुक्काम- पोस्ट आर्थर रोड कारागृह’ अशी आमची ओळख बनली. दिवस उलटत होते. वातानुकूलित न्यायालयातील आरामदायी खुच्र्या गैरसोयीच्या वाटू लागल्या. मग आमच्याच मागणीनुसार लाकडाच्या लांबलचक बाकडय़ांनी घेतली. (अधिक पत्रकारांना न्यायालयात प्रवेश मिळावा म्हणून!)
न्या. टहलियानी यांचा पाठ मी प्रामाणिकपणे तंतोतंत पाळत होतेच, कारण आमच्या संपादकीय विभागाची तीच भूमिका होती. त्यानुसार मी संयत बातम्या देत होते. विशेष म्हणजे, न्या. टहलियानी यांनी त्याची दखल घेतली. एकदा त्यांनी भर कोर्टात विचारले, ‘‘लोकसत्ता’चं कोण आहे?’’ माझ्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. तरीही घाबरलेल्या अवस्थेत मी उभी राहिले. आणि ते एकदम म्हणाले, ‘तुमचे रिपोर्टिग इतरांपेक्षा चांगले असते.’ त्यांच्या त्या प्रशस्तीने माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला आणि आपण ‘राईट ट्रॅक’वर रिपोर्टिग करीत असल्याबाबत समाधान वाटले. स्वत:चे भाष्य न करता अचूक रिपोर्टिग करण्यासाठी माझ्या वरिष्ठांनी मला सतत केलेले मार्गदर्शन हा इतरांच्या तुलनेत माझ्या दृष्टीने प्लस पॉईंट ठरला.
हळूहळू माझ्यातील बुजरेपणा कमी होत गेला. मी त्या वातावरणाशी पूर्णतया समरस होऊन गेले. एकंदर न्यायालयीन वातावरणातील तणावही सैलावत गेला. स्वत: न्यायाधीश, अ‍ॅड. निकम, इतर वकील, न्यायालयीन स्टाफ,  यांच्यातील शिष्टाचाराच्या भिंती कोसळल्या. आमच्या मौज-मस्तीला न्यायालयाच्या विनोदाची जोड मिळत गेल्याने या गंभीर खटल्यात खेळीमेळीचे वातावरण तयार झाले. कसाबची ‘नौटंकी’ तर सुरू होतीच. त्यातच काही मुद्दय़ांवर अ‍ॅड. निकम आणि अ‍ॅड. काझ्मी यांच्यातील वादात न्यायाधीश विनोदाची पुडी सोडून हशा पिकवत असत. हे सर्व कमी म्हणून की काय, अ‍ॅड. एजाज नक्वी आणि ए. जी. ठोंगे यांनी न्यायालयात पाऊल ठेवताच सर्वत्र हास्याचे तरंग उमटत. ‘फनी वकील’ म्हणूनच ते आमच्यात प्रसिद्ध झाले होते.
पावसाळ्यातील एक मजेशीर अनुभव आहे.. सलग तीन दिवस मुसळधार पाऊस पडला होता. सोमवारी दुपापर्यंत लोकल गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडले होते. पण तरीही न्यायाधीशांचा कामाच्या बाबतीतील काटेकोरपणा लक्षात घेता मी वेळेत पोहोचता यावे, म्हणून घरातून लवकर निघाले होते. न्यायालयाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचले. वाटले सर्व काही ठीक आहे, बरं झाले वेळेत पोहोचले. मात्र आतमध्ये शिरताच आपण न्यायालयात आलो आहोत ती जलायशात, हेच कळेना! तेवढय़ात एक इलेक्ट्रॉनिक मीडियाची मैत्रीण आली आणि आम्ही दोघी एकमेकींना आधार देत त्या गुडघाभर पाण्यातून वाट काढत न्यायालयाच्या दिशेने जाऊ लागलो. आम्ही  धडपडत कशाबशा न्यायालयात पोहोचलो आणि कळले  की, तिथपर्यंत पाणी भरले होते. पण आम्ही पोहोचण्याआधीच पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ते पाणी उपसले होते.  त्या दिवशीही न्यायालयाचे कामकाज चालले आणि पुन्हा एकदा आम्ही जलमय झालेल्या न्यायालयातून वाट काढत बाहेर परतलो.
तशीच वादळाच्या दिवशी घेतलेला अनुभवही गमतीदार आहे. मुंबईला वादळाचा तडाखा बसणार असल्याच्या वृत्ताची टेप दिवसभर वृत्तवाहिन्यांवर ‘चालवली’ जात होती. मुंबईतील बहुतांश कार्यालये सतर्कतेचा इशारा म्हणून लवकर सोडण्यात आली होती. त्या वेळी अ‍ॅड. निकम न्यायाधीशांना म्हणाले की, तुमच्या लाडक्या शाळकरी मुलांना म्हणजेच पत्रकारांना लवकर घरी जायचे असेल, तेव्हा कोर्ट लवकर सोडा.  न्यायाधीशांनी आमच्याकडे तशी विचारणा केली. आम्ही गुणी विद्यार्थ्यांप्रमाणे नकारार्थी उत्तर दिले आणि मग न्यायाधीशांनी ‘अ‍ॅड. निकम, तुम्हाला लवकर जायचे आहे म्हणून या मुलांचे कारण कशाला पुढे करता?’ असा मिश्किल टोला त्यांना हाणला. त्याचबरोबर न्यायालयात हशा पिकला!
त्यानंतरच्या दिवसांत स्वाईन फ्ल्यूने न्यायालयीन परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण केले. स्वाईन फ्ल्यू झालेल्या रुग्णांना न्यायालयासमोरच असलेल्या कस्तुरबा रुग्णालयात ठेवण्यात येत होते. त्यामुळे तो परिसर म्हणजे डेंजर झोन बनला होता. मग आम्हालाही अक्षरश: तोंडाला रुमाल किंवा मास्क लावून न्यायालयात येणे न्यायालयाने बंधनकारक केले होते. पण त्या वातावरणाची मजाही आम्ही पुरेपूर  लुटली. एवढेच नाही तर ‘न्यायालयीन परिसरात स्वाईन फ्ल्यूने घबराट’ अशा आशयाच्या ‘इंटरेस्टिंग’ बातम्याही आम्ही त्या वेळी दिल्या. परिणामी आमच्याच घरच्यांकडून न्यायालयात जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला. पण आम्ही कसले ऐकतो?!   
आणखी एक नाटय़मय प्रसंग! सीएसटी स्थानकावर कसाब आणि इस्माईल गोळीबार करताना दिसणाऱ्या दृष्याची सीडी न्यायालयात दाखविण्यात येणार होती. साहजिकच आम्ही सगळ्यांनी लवकर येऊन जागा पटकावल्या होत्या. न्यायालयात मोठा स्क्रिन लावण्यात आला होता. न्यायालयाला मिनी थिएटरचे रूप आले होते. पण सीडीचा दर्जा खराब असल्यामुळे काहीच दिसले नाही. त्या दिवशी सगळ्याच पत्रकारांनी ‘पिक्चर फ्लॉप हो गयी’ म्हणून एकमेकांच्या फिरक्या घेतल्या.
अर्थात जे २५३ दिवस मी नित्यनेमाने न्यायालयात गेले, त्या पूर्ण काळात सारे काही आलबेल घडले असे नाही. काही तणावाचे, काही कटु अनुभवही आलेच. एकदा माझ्या बातमीवरून अ‍ॅड. निकम आणि मुख्य तपास अधिकारी रमेश महाले यांनी न्यायालयातच माझी तक्रार केली. ‘ही पत्रकार व्यक्तिगत राग काढण्यासाठी पोलिसांविरुद्ध जाणूनबुजून लिहिते’, असा अन्याय्य आरोपही त्यांनी माझ्यावर केला. पण त्यावेळी न्यायाधीशांनी ‘तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तुला जे लिहायचे ते तू लिही’, असे सांगून मला सावरले.. आत्मविश्वास दिला. नंतरही असे प्रंसग अनेकदा घडले.  
खटल्याच्या सुनावणीदरम्यान दररोज मुंबई पोलिसांच्या तपासातील चुका उजेडात येत होत्या आणि हा खटला चालविणारे न्या. एम. एल. टहलियानी त्याबाबत कडक ताशेरेही ओढत होते. इतर वृत्तपत्रांच्या तुलनेत आमच्या वृत्तपत्राने याबाबतची वृत्ते अधिक प्रसिद्ध केली. त्याचा परिणाम म्हणून एक दिवसासाठी माझा ‘एन्ट्री पास’ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. परंतु न्यायाधीशांनीच आपल्या ऑर्डर्लीला पाठवून मला न्यायालयात बोलावले. त्यानंतर अभियोग पक्षातर्फे रीतसर माझी तक्रारही करण्यात आली. परंतु न्यायाधीशांनीच ‘काय चुकीचे लिहिले तिने?’ म्हणून रोखठोक विचारणा केली आणि पास कायमचा रद्द होण्याचे संकट टळले. पण तो पूर्ण दिवस मी भयंकर ‘ट्रॉमा’मध्ये होते. न्यायालयात जे घडले तेच तर लिहिले, मग त्यासाठी  अशी शिक्षा कशी दिली जाऊ शकते, या विचाराने मी हैराण झाले होते. त्या दिवशीचे कामकाज संपल्यानंतर न्यायाधीशांनी मला त्यांच्या चेंबरमध्ये बोलावले. माझी मन:स्थिती पाहून माझ्या मैत्रिणीने माझ्यासोबत येण्याची तयारी दाखविली. न्यायाधीशांकडून बोलवणे येईपर्यंत आम्ही दोघी बाहेरच बोलत बसलो होतो. त्याचवेळी पोलीस कसाबला न्यायालयातून त्याच्या तुरुंगातील ‘अंडा सेल’मध्ये नेत होते. मी ज्या बाकडय़ावर बसले होते, तेथे कसाबच्या चपला ठेवलेल्या होत्या. तो माझ्याकडे बघून छद्मी हसत होता. मी साफ दुर्लक्ष केले. पण चपला घालताना तो एकदम ‘क्यों मॅडम, कैसी हो?’ असे खवचटपणे बोलला. तो मला अजून काहीतरी बोलणार, तेवढय़ात पोलीस त्याला खेचत त्याच्या ‘अंडा सेल’च्या दिशेने घेऊन गेले. त्याच्या त्या खवचट बोलण्याचा मला प्रचंड राग आला होता आणि त्यावर कसे रिअ‍ॅक्ट व्हायचे, ते मला कळतच नव्हते.  माझ्यावर काय बेतले आहे आणि हा?.. असे मनातून वाटले. परंतु दुसऱ्या क्षणी विचार आला, आपल्याप्रमाणे हिलासुद्धा न्यायालयात वारंवार उभं केलं जातंय, ओरडा खायला लागतोय, असे त्याला माझ्याबद्दल वाटले असावे आणि म्हणूनच तो मला अशा प्रकारे चिडवून गेला असावा! अशा विचित्र विचारात मग्न असतानाच न्यायाधीशांनी मला चेंबरमध्ये बोलावले. त्यांच्यासमोर आपण (म्हणजेच माझ्या वरिष्ठांनी सांगितलेली) भूमिका ठामपणे मांडायची, असे ठरवून मी त्यांच्या चेंबरमध्ये प्रवेश केला. परंतु तेथे गेल्यानंतर मात्र त्यांनी मला पुन्हा निवांत केले. ‘अशा गोष्टी मनाला लावून घेत जाऊ नको. फक्त लिहिताना काळजीपूर्वक लिही’, असा सल्ला न्यायाधीशांकडून मिळाला आणि मनातील होत्या-नव्हत्या त्या शंकाकुशंकांना तिलांजली देऊन निर्धास्तपणे बाहेर पडले. ऑफिसनेही माझी बाजू समजून घेतल्याने चिंता मिटली.
प्रवेशद्वारापासून न्यायालयापर्यंत बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी मात्र त्या दिवशी मला ‘मी जणू काही आरोपीच आहे’, अशा प्रकारे वागणूक दिल्याने तो कटू अनुभव सतत मला डाचतो.  
‘क्यों मॅडम, कैसी हो..’ कसाबने मला सुनाविलेल्या त्या चार शब्दांबाबत माझ्या  अन्य पत्रकार सहकाऱ्यांना खूप अप्रुप वाटले होते. ‘अरे, तुम पहली रिपोर्टर हो जिस से कसब ने बात की हैं’, ‘मैंने सुना की, कसब ने तुम को चिडाया’, ‘असा कसा काय बोलला एकदम तो तुझ्याशी’, अशा अनेक प्रश्नांना मी पुढचे काही दिवस उत्तरे देत होते.
खटला सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी लोकसभा निवडणुकांचे वातावरण तापू लागले, तशी न्यायालयातील बातमीदारांच्या संख्येत घट होऊ लागली. बंदोबस्तही वाढत गेला. निवडणुकांच्या निकालानंतर परिस्थिती पूर्ववत झाली आणि पुन्हा एकदा न्यायालयात गजबज वाढली. त्या दरम्यान, न्यायालयात आमच्याभोवती साध्या कपडय़ांतील पोलिसांचे कडेही असल्याचे आम्हाला कळले. मग काय, आम्ही त्यांनाही आमच्यात सामील करून घेतले. पुढे न्यायाधीशांना भेटण्यासाठी किंवा एखादी माहिती मिळविण्यासाठी आम्हाला त्यांचीच मदत होऊ लागली.
कोणता साक्षीदार स्वत:च्या मनाने बोलतोय, यावर आमच्यात जेवणाच्या वेळी गप्पा होत. एक-दोन साक्षीदार सोडले, तर बाकीचे पढतराव होते. कसाबने न्यायालयात उभे राहून ज्या वेळेस गुन्ह्याची कबुली दिली, तेव्हा तो पंजाबी लहेजामध्ये साळसूदपणे घटनाक्रम सांगत होता. एवढेच नाही, तर आपल्या कृत्यासाठी ‘अल्ला’ नाही, तर लोकच शिक्षा देऊ शकतात, असे म्हणून फासावर लटकविण्याची विनंती त्याने केली, तेव्हा तो खरोखरच पस्थितीचा बळी बनलेला आहे का, त्याला पश्चाताप होतो आहे का, असाही विचार मनाला शिवून गेला. पण साक्षी-पुराव्यांबाबत स्पष्टीकरण देताना कसाबचा धूर्तपणा पाहून आपण याच्याबद्दल किती चुकीचे विचार करतो, असे वाटले आणि स्वत:चीच कीव आली. एके क्षणी आजारपणामुळे उभेही राहता येत नसलेला कसाब, महत्त्वाच्या क्षणी मात्र तरतरीत होऊन उभा राही. एवढेच नव्हे, तर निर्लज्जपणे  स्वत:च्या बचावासाठी वेगवेगळी कथानकेही रचून न्यायालयासमोर सादर करी. एकलकोंडय़ा परिस्थितीत एवढे दिवस राहूनही याच्यावर काही फरक कसा पडत नाही, हाही प्रश्न राहून राहून मला भेडसावत राही.
कधी कधी ‘ड्राय डे’ असे. दिवसभर बसूनही बातमी मिळत नसे. त्या वेळेस मनातल्या मनात आम्ही ‘आता तरी कसाब उभा राहो आणि काहीतरी बोलो’, अशी करुणा भाकायचो. कधी-कधी तर त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या पोलिसांना किंवा त्याच्या बाजूला बसलेल्या फहीम-सबाला आम्ही खाणाखुणा करून  ‘कसाब काय करतोय’, असे विचारायचो. अनेकदा सबा-फहीम न्यायालयातून बाहेर पडल्यावर मला नावाने हाक मारून म्हणत- ‘आप बहुत अच्छा लिखती हैं, सुना हैं’. मी केवळ हसून त्यांना प्रतिसाद देत असे. कधी-कधी मात्र त्यांनी वेळोवेळी केलेल्या अर्जाबाबत त्यांना माहिती विचारत असे.  
खटला लवकरात लवकर संपवावा, यासाठी खटल्याची सुनावणी रोजच्या रोज होई. त्यामुळे मला मधेच सुट्टी घेणे अशक्य झाले होते. माझ्या दोन साप्ताहिक सुट्टय़ांपैकी एका सुट्टीवर मी कसाब खटल्यासाठी पाणी सोडले होते. अधूनमधून अभियोग पक्ष अमूक कालावधीपर्यंत सुनावणी संपवू, असे आश्वासन देऊन सगळ्यांनाच आशेवर ठेवत होते. प्रत्यक्षात मात्र दिवस वाढतच चालले होते. पण निकालाची तारीख जेव्हा जाहीर झाली, तेव्हा ‘आता खटला संपणार आणि आपणही सुटणार’, या भावनेने सर्वच जण सुखावले.
गेल्या आठवडय़ात कसाबला फाशीची शिक्षा सुनावून खटला निकाली निघाला आणि आम्ही सगळेच पत्रकार सुटलो! पण आता अगदी मोकळेपण खायला उठतेय. गेले वर्षभर त्या कोर्टाची, तेथील माणसांची, त्या एकंदर वातावरणाची सवय झाली होती. त्या सगळ्याची उणीव आता सतत भासत राहतेय. काहीतरी ‘मिसिंग’ आहे, असे प्रत्येक दिवशी वाटते. अगदी माझ्या मनातील ही उणीव न्या. टहलियानी यांनीही निकालानंतर प्रसारमाध्यमांनी बजाविलेल्या कामगिरीची स्तुती करताना बोलून दाखविली.
एकंदर हा खटला किती महत्त्वाचा होता, अख्ख्या जगाने भारताचे या निकालासाठी कसे कौतुक चालवले आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर या खटल्याचे महत्त्व काय- याचे विश्लेषण आता रोज माध्यमांमध्ये प्रसिध्द होत आहे. ते वाचताना मला किती अनमोल संधी मिळाली, याची जाणीव होतेय आणि समाधानाने ऊर भरून येतोय.

First Published on November 21, 2012 3:34 am

Web Title: kasab says how are you madam
टॅग Kasab