थकलेली इमारत, गळके छत, तडे गेलेल्या भिंती आणि मोडकळीस आलेली जुनी मांडणी या अशा दैन्यावस्थेत जागतिक कीर्ती मिळवलेल्या ‘त्या’ शेकडो कलाकृती दररोज जीवन-मरणाचा सामना करत आहेत; पण याही स्थितीत या कलाकृतींच्या जतनासाठी त्यांची धडपड सुरू आहे. ..ही व्यथा आहे विख्यात कलाकार केकी मूस यांच्या ‘मूस आर्ट गॅलरी’ची, जिला गरज आहे मदतीच्या चार हातांची!
केकी मूसचे कला लेणे
जळगाव जिल्ह्य़ातील चाळीसगाव ही केकी मूस यांची कर्मभूमी. चाळीसगाव रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या आपल्या बंगलीत या मनस्वी कलाकाराने आयुष्यभर केवळ आणि केवळ कलेची साधना केली. चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रण, ओरिगामी आणि अशाच अनेक कलांच्या विश्वात त्यांनी लीलया भ्रमंती केली. पाच दशकांच्या या वास्तव्यात त्यांनी जागतिक कीर्तीच्या असंख्य कलाकृती निर्माण केल्या. शेकडो चित्रे, छायाचित्रे, शाडू-मातीतील लक्षवेधी शिल्पे, ओरिगामीचे असंख्य नमुने, काष्ठ शिल्पाकृती, हस्तकलाकृती, व्यक्तिचित्रे, आभासी चित्रे अशा एका ना दोन हजारो कलाकृतींचा यात समावेश आहे. याशिवाय कलेच्या प्रांतातील जगभरातील दुर्मीळ पुस्तकांचा संग्रहही त्यांनी केला.
मूस यांच्या मृत्यूनंतर या साऱ्या ठेव्याचे त्यांच्या घरातच संग्रहालयात रूपांतर करण्यात आले. ‘कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठान’ या संस्थेकडे या साऱ्या ठेव्याचे पालकत्व आले. गेली पंचवीस वर्षे अपुरा निधी, मनुष्यबळ आणि यंत्रणेच्या पाश्र्वभूमीवरही या संस्थेने या दुर्मीळ ठेव्याचे जतन केले; पण आता ही इमारत मोडकळीस आली आहे, छत गळू लागले आहे, आतील मांडणीही जुनी झाली आहे. दुसरीकडे समाज ते शासन साऱ्यांचेच दुर्लक्ष होत असल्यामुळे संग्रहालय जतनासाठी संस्थेचा सुरू असलेला हा लढा एकटय़ाच्या जिवावर सुरू आहे. त्यांच्या या लढाईत सामाजिक जाणिवेतून दात्यांनी आपले योगदान द्यावे आणि हा सांस्कृतिक वारसा अक्षय करावा.