‘केईएम’मध्ये रुग्णांच्या नातेवाइकांचा लोखंडी सळ्यांनी हल्ला

महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात बालरुग्ण विभागात काम करीत असलेल्या तीन निवासी डॉक्टरांवर शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता लाकडी आणि लोखंडी सळ्यांनी हल्ला करण्यात आला. यात डॉक्टरांना डोक्यावर, पाठीवर जबर जखमा झाल्या असून सतत होत असलेले हल्ले आणि रुग्णालयातील अपुरी सुरक्षाव्यवस्था याविरोधात केईएममधील सर्व ७८४ निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहेत. लागोपाठ आलेल्या सुटय़ामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा होऊ शकत नसल्याने संप चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान शहरातील डॉक्टरांच्या विविध संघटनांनी निवासी डॉक्टरांना पाठिंबा दर्शविला आहे.
डेंग्यूमुळे कोमात गेलेल्या अबू सुफियान कुरेशी या साडेतीन वर्षांच्या बालकाला गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास केईएममध्ये आणण्यात आले. अतिदक्षता विभागात जागा नसल्याने बालकावर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. बालकाची तब्येत बिघडत असल्याने त्याची कल्पना नातेवाईकांना देण्यात आली. पहाटे बालकाची स्थिती बिघडल्याने त्याचे वडील आणि इतर तीन पुरुष नातेवाईकांनी तेथे असलेल्या निवासी डॉक्टरांवर हल्ला चढवला. बालरुग्ण विभागात असलेल्या महिला सुरक्षारक्षकाकडील काठी हिसकावून घेत त्यांनी डॉक्टरांना मारले. एकाने लोखंडी सळईने मारहाण सुरू केली. यात डॉ. कुशल शरणागत आणि डॉ. पुनित गर्ग जखमी झाले. गर्ग यांच्या डोक्यावर मार बसला, तर शरणागत यांच्या पाठीत सळी खुपसली गेली. या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत आहे, अशी माहिती केईएम मार्डचे अध्यक्ष डॉ. मंदार बाविस्कर यांनी दिली. या संदर्भात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यावर चार आरोपींपैकी मेहराजुद्दीन कुरेशी आणि जुनेद कुरेशी यांना अटक करण्यात आली.
दरम्यान केईएममधील सुरक्षाव्यवस्था आणि जूननंतर झालेल्या या दुसऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ केईएममधील निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. जूनमध्ये मार्डने संप केल्यानंतरच्या ८० दिवसांत राज्यात डॉक्टरांवर आठ हल्ले झाले आहेत. त्यातील दोन हल्ले केईएममधील आहेत. सुरक्षेबाबत प्रशासन अत्यंत उदासीन असल्याने टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे. केईएममधील सुरक्षेबाबत ४८ तासांत निर्णय घेतला नाही तर संपूर्ण राज्यातील निवासी डॉक्टर संपावर जातील, असा इशारा मार्डचे राज्याचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी दिला.
सुट्टी असल्याने केईएममधील गर्दी कमी होती, त्यामुळे वरिष्ठ डॉक्टर तसेच शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने ८२ शस्त्रक्रिया, आठ प्रसूती यांच्यासह दोन हजार ओपीडी रुग्णांना तपासण्यात आले, अशी माहितीही सुपे यांनी दिली. डॉक्टरांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांमुळे डॉक्टर-रुग्ण यांच्या नात्यावर परिणाम होत आहेत. रुग्णसेवा करून मार खावा लागत असेल तर यापुढे तरुण वैद्यकीय क्षेत्रात येण्यास कचरतील व त्याचे दूरगामी परिणाम समाजाला भोगावे लागतील, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य सरचिटणीस डॉ. सुहास पिंगळे म्हणाले. शारीरिक हिंसेचे कोणतेही समर्थन होऊ शकत नाही. डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळेच आम्ही सुरक्षायंत्रणेशी करार करून डॉक्टरांना गरज पडल्यास १५ मिनिटांत सुरक्षारक्षक बोलावण्याची तजवीज केली आहे. या हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो, असे असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट या संस्थेच्या सहसचिव डॉ. सुषमा म्हणाल्या.

केईएममध्ये १४५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज असून आता केवळ दहा कॅमेरे आहेत. बालरुग्ण विभागातही कॅमेरा बसवण्यात आला आहे, मात्र तो बंद असल्याने त्यात हल्ल्याचे कोणतेही चित्रीकरण झालेले नाही, असे निवासी डॉक्टरांनी सांगितले.

डॉक्टरांवरील हल्ल्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणी दोघांना अटक झाली आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी १२ बाऊन्सर नेमले जातील. त्याचप्रमाणे सोमवारी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसोबत सुरक्षेसंदर्भात बैठक होईल. सुरक्षा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र निविदा काढून त्याप्रमाणे पूर्ण प्रक्रिया होण्यासाठी काही काळ आवश्यक आहे.
– डॉ. अविनाश सुपे,
अधिष्ठाता केईएम

यापूर्वीचे हल्ले
’१ जानेवारी २०१४ पासून राज्यात २८ घटना
’मुंबईत सहा घटना (१ जेजे, २ केईएम, ३ शीव)