दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याशेजारील बालवाडीचे स्थलांतर करण्यास भाग पाडण्यात येत असून अन्य आजूबाजूच्या जागा मिळविण्याचाही प्रयत्न सुरू आहे. केरळी महिला समाजाची ‘डॅफोडिल्स’ ही बालवाडी गेली ८३ वर्षे तेथे सुरू असून आता महापालिकेच्या दबावामुळे तिला स्थलांतर करावे लागणार आहे.

शिवसेनाप्रमुखांचे स्मारक शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात करण्यात येणार असून महापालिकेने ही जागा स्मारक उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विश्वस्त संस्थेला देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्य विधिमंडळात नुकतीच त्याबाबत कायदेशीर तरतूदही करण्यात आली. मात्र ही जागा पुरेशी नसल्याने महापौर निवासाच्या आजूबाजूच्या जागा मिळविण्याचाही प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी महापालिकेने दीर्घ मुदतीने संस्थांना भाडेतत्वावर दिलेल्या जागा ताब्यात घेण्यासाठी पावले टाकण्यात येत आहेत.

केरळी समाजाची बालवाडी गेली ८३ वर्षे या जागेत सुरू असून त्यांच्या भाडेपट्टय़ाची (लीज) मुदत संपली आहे. ती वाढवून देण्यास महापालिकेने नकार दिला आहे. ही जागा रिकामी करून घेण्याचे पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, बालवाडीचे स्थलांतर करण्यास संस्थेचा विरोध असून महापालिकेने सुचविलेल्या पर्यायी जागा त्यांना अमान्य आहेत. त्यामुळे महापालिका सक्तीने ही बालवाडी बंद करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा मुद्दा असल्याने यासंदर्भात महापालिकेच्या उच्चपदस्थांकडे विचारणा केली असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. मात्र यापुढे भाडेपट्टय़ाचे नूतनीकरण केले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा वाद पुन्हा न्यायालयात जाण्याची चिन्हे आहेत. ‘पार्क क्लब’ ची जागाही स्मारकासाठी मिळविण्याचे प्रयत्न असून त्यांना नोटीस देण्यात आली आहे. आजूबाजूच्या जागा ताब्यात आल्यावर स्मारकाचा आराखडा निश्चित केला जाणार आहे.

संस्थेने पर्यायी जागा स्वीकारावी-देसाई

‘केरळी समाजाची बालवाडी अनेक वर्षे शिवाजी पार्क येथे असल्याने त्यांना महापालिकेने दादरच्या भवानी शंकर रस्त्यावर आणि माहीमला पर्यायी जागा देऊ केली आहे. त्यातील एक जागा संस्थेने स्वीकारावी’, अशी अपेक्षा सेनेचे ज्येष्ठ नेते  सुभाष देसाई यांनी व्यक्त केली. ‘मी या संस्थेच्या विश्वस्तांची बैठक घेऊन  चर्चाही केली आहे. या दोन्ही ठिकाणी लिफ्टचीही सोय आहे. त्यामुळे संस्थेच्या वयस्कर विश्वस्तांची गैरसोय होणार नाही. ही संस्था पालिकेची भाडेकरू आहे. मात्र केवळ नियमावर बोट ठेवले जाणार नाही, असे ते म्हणाले.