धोकादायक असल्याच्या कारणास्तव पालिकेचा निर्णय

मध्य रेल्वेवरील किंग्ज सर्कल स्थानकाजवळील दोन पादचारी पूल धोकादायक असल्याच्या कारणास्तव पालिकेने आठ दिवसांपूर्वी बंद केले आहेत. गांधी मार्केटकडे जाण्यासाठी या पुलांचा नागरिकांना उपयोग होत होता. या पुलांची आणखी एक चाचणी गुरुवारी रात्री करण्यात येणार असून त्यानंतरच पूल पाडून टाकायचा की दुरुस्त करायचा याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

किंग्ज सर्कल पुलाच्या बाहेर माटुंगा आणि शीव उड्डाणपुलाच्या मध्ये असलेले दोन पादचारी पूल धोकादायक असून ताबडतोब बंद करण्याचे निर्देश पूल विभागाने एफ उत्तर विभागाला दिले होते. त्यानुसार दक्षिण आणि उत्तर दिशेला असलेले हे पूल पालिका प्रशासनाने गेल्या आठवडय़ात बंद केले. मात्र या धोकादायक पुलांखालून अतिवेगाने जाणाऱ्या  वाहनांची सतत वर्दळ असते. त्यामुळे हा पूल पडल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते.

तसेच पूल नसल्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना त्रास होणार आहे. या पुलाची आणखी एक तांत्रिक तपासणी गुरुवारी रात्री करण्यात येणार असून त्यानंतर पुलाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती नगरसेविका शिरवडकर यांनी दिली.

हिमालय पूल दुर्घटनेनंतर प्रशासनाने आयआयटीच्या मदतीने तपासणी केली असता एक पूल धोकादायक असून दुसऱ्या पुलाच्या पायऱ्या खराब झाल्याचे आढळून आले आहे. हे पूल बंद केल्यास पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना त्रास होणार असल्यामुळे या भागात सिग्नल उभारण्याची मागणी केली आहे. ते शक्य नसल्यास पुलाखालून रस्ता ओलांडण्यास जागा ठेवण्याची मागणी केली आहे.    – राजश्री शिरवडकर, नगरसेविका

 

बेस्टची पहिली मोफत बस सेवा

बंद केलेल्या उड्डाणपुलांमुळे मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडून काही भागात मोफत बससेवा दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विशेष बैठक घेऊन बेस्ट प्रवासात सवलत देण्याची सूचना केली होती. बेस्टकडून त्याचे तातडीने पालन करत पहिल्या टप्प्यात गुरुवारपासून किंग्ज सर्कल स्थानकापासून बससेवा सुरू केली आहे.

बससेवेचा मार्ग हा किंग्ज सर्कल स्थानकापासून सुरू होऊन ही बस वर्तुळाकार पद्धतीने चालविण्यात येणार आहे. किंग्ज सर्कल स्थानकापासून ही बस सायन रुग्णालयाकडील उड्डाणपुलाकडून पुन्हा किंग्ज सर्कल स्थानकापर्यंत असणार आहे. किंग्ज सर्कल स्थानकाला लागून असलेला पादचारी पूल बंद करण्यात आला आहे. या बस सेवेमुळे पादचारी, प्रवाशांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडण्याची वेळ येणार नाही. बससेवेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसून मुंबईतील अन्य मार्गावरही सवलत बससेवा चालविण्याचा विचार केला जात आहे.