‘कोमसाप’मधील वादाप्रकरणी मधु मंगेश कर्णिक यांचे स्पष्टीकरण

मुंबई : अनियमितता आणि मनमानीच्या आरोपांवरून कोकण मराठी साहित्य परिषदेत उफाळलेल्या कलहास आता तोंड फुटले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या नव्या फैरी झडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ‘कोमसाप’मधील कथित गैरव्यवहारांबद्दल जे काही आक्षेप घेतले जात आहेत, त्या साऱ्या गोष्टी महेश केळुस्कर यांच्या कार्याध्यक्ष व अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतच घडलेल्या असल्याने माझा त्याच्याशी दुरान्वयानेही संबंध नाही, असे कोमसापचे संस्थापक मधु मंगेश कर्णिक यांनी स्पष्ट केले आहे.

‘लोकसत्ता’च्या गुरुवार, १३ फेब्रुवारीच्या अंकात ‘कोमसापच्या कारभाराला कलहाचा कलंक’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीतून केळुस्कर यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना मधु मंगेश कर्णिक यांनी संस्थेतील गैरकारभाराबद्दल केळुस्कर यांच्याकडेच बोट दाखविले आहे.

‘अनियमितता केळुस्कर यांच्या कारकीर्दीतच’

ही संस्था आणि केशवसूत स्मारकही मीच स्थापन केले, तेव्हा केळुस्कर कुठेच नव्हते. १९९१ ते २००६ या काळात मी ‘कोमसाप’चा अध्यक्ष होतो, २००६ मध्ये मी पदावरून बाजूला झालो. त्यानंतर २००९ मध्ये केळुस्कर हे प्रथम कार्याध्यक्ष व नंतर अध्यक्ष होते. एप्रिल २०१९ मध्ये त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याची ‘खरी कारणे’ कोमसापतर्फे प्रसिद्ध होतील वा नाही, परंतु त्यांची प्रकृती ठणठणीतच आहे, असा चिमटाही कर्णिक यांनी काढला आहे. त्यांचा राजीनामा आणि इतर आर्थिक घोटाळ्यांबद्दल व अन्य गोष्टींबद्दल लिहिणे मला प्रशस्त वाटत नाही, पण या अनियमितता त्यांच्या कारकिर्दीतच घडून आलेल्या आहेत, असा ठपका कर्णिक यांनी एका पत्राद्वारे केलेल्या खुलाशात ठेवला आहे. या बातमीसंदर्भात माझ्यापुरता खुलासा मी करत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.