यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईतील चाकरमान्यांना गणपती चांगलाच पावला आहे. कारण यंदा मध्य रेल्वे पहिल्यांदाच मुंबई ते करमाळी या दरम्यान वातानुकुलित डबलडेकर चालवणार आहे.    गणेशोत्सवादरम्यान या गाडीच्या एकूण २० फेऱ्या या मार्गावर धावणार आहेत. या गाडीचे तिकीट दर अद्याप निश्चित झाले नसले, तरी सध्याच्या जनशताब्दी एक्सप्रेसच्या वातानुकुलित खुर्चीयानाच्या तिकिटांएवढेच हे दर असतील, असा अंदाज मध्य रेल्वेचे अधिकारी व्यक्त करत आहेत. कोकणात जाण्यासाठी आणि कोकणातून येण्यासाठी ही गाडी प्रत्येकी १० फेऱ्या करणार आहे.
०२००५ डाउन प्रीमियम वातानुकुलित डबलडेकर विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून २२, २४, २६, २८, ३० ऑगस्ट आणि १, ३, ५, ७, ९ सप्टेंबर या दिवशी रवाना होईल. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून सकाळी ५.३० वाजता सुटून करमाळीला त्याच दिवशी संध्याकाळी ४.३० वाजता पोहोचेल. तर ०२००६ अप प्रीमियम वातानुकुलित डबलडेकर विशेष गाडी करमाळीहून २३, २५, २७, २९, ३१ ऑगस्ट आणि २, ४, ६, ८, १० सप्टेंबर या दिवशी सकाळी ६.०० वाजता रवान होऊन त्याच दिवशी संध्याकाळी ५.४० वाजता मुंबईला पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी याच स्थानकांवर थांबणार आहे. या गाडीत ८ वातानुकुलित खुर्चीयान डबे असतील. गाडीचे आरक्षण ऑनलाइनच होणार असून त्याची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल. वातानुकुलित डबलडेकर गाडी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या मार्गावर चालावी, हे मध्य रेल्वेचे स्वप्न होते. त्यासाठी आम्ही जय्यत तयारी केली असून स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आम्ही या गाडीची घोषणा करून प्रवाशांना एक सुखद भेट देत आहोत, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.