संभाजी भिडेंना दगड मारताना बघितलं असा कुठलाही उल्लेख 2 जानेवारीच्या तक्रारीत मी केलेला नाही असे अनिता सावळे यांनी सांगितलं आहे. एक जानेवारीला भीमा कोरेगावला जातीय दंगल घडली त्याची तक्रार सावळे यांनी पोलिसांकडे 2 जानेवारी रोजी केली. मात्र, या एफआयआरमध्ये प्रमुख सूत्रधार मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे असल्याचं मात्र नमूद करण्यात आल्याचं त्या म्हणाल्या.

मात्र, दगडफेक झाली, हल्लेखोरांच्या हातात सळया व तलवारी होत्या, सोड्याच्या बाटल्या होत्या आणि त्यांनी केलेला हल्ला आपण स्वत: डोळ्यांनी बघितल्याचं सावळे म्हणाल्या. मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे व त्यांचे सवर्ण साथीदार यांनी ही दंगल घडवून आणल्याचा आरोपही त्यांनी केला असून मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण अयोग्य असल्याचं त्यांनी सांगितलं.

तसेच ही एफआयआर आपण मागे घेतलेली नसून कधीही मागे घेणारही नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. जाती जातींमध्ये तेढ निर्माण करून दंगली घडवण्यात येत असून हे थांबलं पाहिजे असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. त्यासाठीच आपण ही एफआयआर दाखल केली असून भीमसैनिकांचा व बहुजनांचा आपल्याला पाठिंबा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.