व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशस्तरावर होणाऱ्या ‘सी-मॅट’ या सामाइक प्रवेश परीक्षेत औरंगाबादमधील कृष्णा देशमुख या विद्यार्थ्यांने प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. कृष्णाने ४०० पैकी ३२६ गुणांची कमाई करत ही कामगिरी केली आहे.
कृष्णा मूळचा नांदेडचा. गोव्यातील बिट्स पिलानी या शिक्षणसंस्थेमधून ‘कॉम्प्युटर सायन्स’ या विषयात अभियांत्रिकी पदवी मिळविल्यानंतर लगेचच त्याने ही परीक्षा दिली. सीमॅटची त्याची दुसरी संधी. पण, दुसऱ्याच संधीत त्याने देशात पहिला येण्याचा मान मिळविला आहे. पहिल्या खेपेला त्याला ४०० पैकी ३०६ गुण मिळाले होते. अभियांत्रिकीचा अभ्यास करत असतानाच तो कॅट, सीमॅट या प्रवेश परीक्षांची तयारी करत होता. कॅट ही ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’ (आयआयएम) या देशातील अग्रगण्य व्यवस्थापन शिक्षणसंस्थेच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी प्रवेश परीक्षा हे त्याचे पहिले लक्ष्य आहे. त्यामुळे, ‘सीमॅटच्या यशावर विसंबून न राहता आपण कॅटच्या तयारीला लागणार आहोत,’ असे कृष्णाने सांगितले.
कृष्णाचे वडील लातूर येथे गटविकास अधिकारी आहेत. तर आई विजया कामळसकर नांदेडच्या के.आर.एम. महिला महाविद्यालयात प्राचार्य आहेत. कॅटसाठी केलेल्या तयारीचा आपल्याला खूप उपयोग झाला असे कृष्णा सांगतो.