शिक्षण पूर्ण करूनही नोकरी न मिळालेल्या बेरोजगार तरुणांना ‘लालबागच्या राजा’ने मदतीचा हात पुढे केला आहे. लवकरच लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘लालबागचा राजा नोकरी शोधयंत्रणा’ सुरू करण्याचा निर्णय घेतला असून केवळ शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील बेरोजगारांना या केंद्रामार्फत माहिती उपलब्ध होणार आहे.
तरुणांना अनेकदा रोजगाराच्या संधींबाबत बेरोजगारांना माहिती मिळत नाही. ‘लालबागचा राजा नोकरी शोधयंत्रणा केंद्रा’मार्फत समाजाच्या तळागाळातील सर्व उच्चशिक्षित व सर्वसाधारण शिक्षित विद्यार्थ्यांना त्यांच्या योग्यतेनुसार नोकरी कशी मिळविता येईल याची माहिती दिली जाणार आहे.
रेल्वे, एअरलाइन्स कंपन्यांमधील विविध स्पर्धा परीक्षा, केंद्रीय लोकसेवा आयोग, अथवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या परीक्षेबाबतची माहिती या केंद्रात उपलब्ध करण्यात येणार आहे. वेबइनर तंत्रज्ञानाचा वापर करून ही माहिती महाराष्ट्राच्या दुर्गम भागातील बेरोजगारापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात येणार असे मंडळाचे मानद सरचिटणीस सुधीर साळवी यांनी स्पष्ट केले.
‘लालबागचा राजा नोकरी शोधयंत्रणा केंद्रा’चे उद्घाटन लालबागचा राजा प्रबोधिनी, लालबाग येथे १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. अच्युत गोडबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.