लोकमान्य टिळक रुग्णालयात साध्या पिशवीत मृतदेह दिल्याचा प्रकार उघडकीस

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : पीपीई, एन ९५ मास्क पाठोपाठ आता करोनाबाधित रुग्णांचे मृतदेह बंदिस्त करण्यासाठीच्या प्लास्टिक पिशव्यांचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला आहे. शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात या पिशव्या उपलब्ध नसल्याने मृतदेह साध्या प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार करोनाबाधित रुग्णाचा मृतदेह रुग्णालयातून बाहेर काढण्यापूर्वी सोडियम हायपोक्लोराइटने त्याचे निजर्तुकीकरण करावे. त्यानंतर मृतदेह हाताळणाऱ्यांमध्ये संसर्ग प्रसार होऊ नये म्हणून कोणताही द्रव मृतदेहातून बाहेर पडू नये यासाठी लीकप्रुफ अशा प्लास्टिक पिशवीत बंद करावा. या पिशवीला बाहेरून हायपोक्लोराइटने निजर्तुकीकरण करावे.

परंतु या प्लास्टिक पिशव्या मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. लोकमान्य टिळक रुग्णालयात सध्या एकही पिशवी उपलब्ध नाही. धारावी येथील ५६ वर्षीय करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह बंद कशात करायचा यावरून एकच गोंधळ उडाला. मृतदेह बंद करण्याची विशिष्ट पिशवी नसल्याने अखेर चतुर्थश्रेणी कामगाराला साध्या पिशवीमध्ये मृतदेह बंद करून द्यावे लागल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

पीपीईप्रमाणे या प्लास्टिक पिशव्या बंद करण्याची सोय असते. तसेच हे प्लास्टिकही तुलनेने अधिक मजबूत असते. त्यामुळे एकदा मृतदेह आत घातल्यानंतर बाहेर कोणताही संसर्ग पसरण्याची शक्यता नसते. एका पिशवीची किंमत सध्या तीन हजार रुपये असून यांच्याही किमतीवर नियंत्रण नसल्याने काही दिवसांनी काळाबाजार सुरू होण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांनी व्यक्त केले.

रुग्णालयातील रुग्णांची संख्या वाढत आहे. तसे पिशव्यांची मागणी करत आहोत. परंतु करोनाबाधित रुग्णाने शिंकल्या आणि खोकल्यातूनच प्रसार होतो. मग साध्या पिशवीत बांधला तरी चालेल. त्याने काहीही धोका नाही, अशी उत्तरे देणाऱ्या रुग्णालय प्रशासनातील एकही जण का मग मृतदेह उचलण्यासाठी का बरे पुढे येत नाही असा प्रश्न रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी उपस्थित के ला आहे.

काही रुग्णालयांकडे पिशव्या उपलब्ध असल्या तरी मोजक्याच आहेत. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात दरदिवशी साधारणपणे ६-७ जणांचा मृत्यू होत आहे. पुढील काळात ही आकडेवारी वाढल्यास काय करणार, असा गंभीर प्रश्न रुग्णालयांसमोर सध्या निर्माण झाला आहे.