बेस्टच्या माथी गेल्या वर्षभरात ६६४ बनावट नोटा,  तब्बल तीन लाखांचे नुक

आधीच आर्थिक गत्रेत अडकलेल्या बेस्ट उपक्रमाच्या मागे गेल्या काही वर्षांपासून बनावट नोटांचे दुष्टचक्र लागले आहे. दर दिवशी बेस्टच्या वाहतूक विभागाचे उत्पन्न रोख जमा होत असताना उत्पन्नापोटी मिळणाऱ्या काही नोटा बनावट असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षांत तिकीट विक्रीतून मिळालेल्या नोटांपकी ६६४ नोटा बनावट असल्याचे आढळले. तर मासिक पास काढण्यासाठी आलेल्या प्रवाशांकडून ९७ बनावट नोटा उपक्रमाला मिळाल्या. या एकूण ७६१ बनावट नोटांमुळे बेस्ट प्रशासनाला २.९० लाखांचे नुकसान सहन करावे लागले. वाहतूक खात्याच्या एकूण उत्पन्नापुढे हे नुकसान नगण्य असले, तरी बेस्ट उपक्रमाची सध्याची आíथक स्थिती पाहता प्रत्येक पसा बेस्टसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे हे तब्बल तीन लाखांचे नुकसान बेस्टला भारी पडण्याची शक्यता आहे.

बेस्ट उपक्रमाच्या वाहतूक विभागाचे उत्पन्न हे दर दिवशीच्या तिकीट विक्रीतून मिळते. हे उत्पन्न रोख रकमेच्या स्वरूपातच असते. गेल्या वर्षी वाहतूक विभागाने तब्बल १२०० कोटी रुपये कमावले. मात्र या १२०० कोटींपकी तीन लाख रुपये बनावट नोटांमुळे वाहतूक विभागाला मिळालेच नाहीत. गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत बेस्टकडे तब्बल ७६१ बनावट नोटा जमा झाल्या. त्यातील हजार रुपयांच्या नोटांची संख्या ९६ इतकी होती. तर  ५०० रुपयांच्या ३२० बनावट नोटा उपक्रमाला मिळाल्या. सर्वाधिक बनावट नोटा फेब्रुवारीत मिळाल्या असून त्यात हजार ते शंभर रुपयांच्या ८४ नोटांचा समावेश आहे.

या बनावट नोटांमध्येही तिकीट काढताना वाहकाच्या हातात दिलेल्या बनावट नोटांची संख्या ६६४ एवढी आहे, तर मासिक पास काढताना बेस्टच्या खिडकीवर दिलेल्या नोटांची संख्या ९७ एवढी आहे. गेल्या वर्षीदेखील हाच प्रश्न उपस्थित झाला असता वाहकाने १०० रुपयांच्या वरच्या नोटा स्वीकारू नयेत, असा एक तोडगा काढण्यात आला होता. मात्र तो व्यवहार्य नसल्याचे २०१४ या वर्षांत मिळालेल्या बनावट नोटांवरून लक्षात आले आहे. कारण १०० रुपयांच्या ३३८ बनावट नोटा प्रशासनाच्या पेटीत आल्या आहेत.

या बनावट नोटा ओळखण्यासाठी बँकेतील कर्मचाऱ्यांना देतात तसेच प्रशिक्षण बेस्टच्या वाहकांना देण्यात यावे, असा मुद्दा समिती सदस्य केदार होंबाळकर यांनी उपस्थित केला. तसेच बेस्टच्या खिडक्यांवर नोटा घेताना त्या तपासून घेण्यासाठी काही यंत्रणा उभारता येईल का, अशी विचारणाही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. मात्र ही यंत्रणा बसवणे बनावट नोटांच्या आकडय़ांच्या तुलनेत खूपच खíचक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यावर भर असेल, असे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी स्पष्ट केले.

बनावट नोटांची आकडेवारी

महिना        १००० रु.   ५०० रु.   १०० रु.    एकूण

जानेवारी        ०८           ३७          ४५        ३१०००

फेब्रुवारी         ०५           २४         ५५         २२५००

मार्च              ११           २१          २१          २३६००

एप्रिल            ०८           २०          ४८         २२८००

मे                 ०४           २०          २७         १६७००

जून               १३           २७          २५         २९०००

जुल               ०२          १८          २३          १३३००

ऑगस्ट          ०६           २७          १६         २११००

सप्टेंबर           ०६           २२          ०१          २२६००

ऑक्टोबर        ११            ३२         १२           २८२००

नोव्हेंबर          १०           २५          २७          २५२००

डिसेंबर           १२           ३६           ४५          ३४५००

एकूण            ९६           ३२०         ३४५        २९०५००