मागील आठ दिवसांपासून रुग्णालयात असलेल्या लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते आहे. त्यांची प्रकृती हळूहळू सुधारते आहे. त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना लिक्विड डाएटवर ठेवण्यात आलं होतं. आज त्यांनी जेवण केलं असंही मंगेशकर कुटुंबीयांच्या सदस्याने सांगितले. ब्रीचकँडी रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. ब्रीचकँडी रुग्णालयातल्या एका डॉक्टरांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे की लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत आधीपेक्षा भरपूर सुधारणा आहे. एबीपी न्यूजने यासंदर्भातले वृत्त दिलं आहे.

जागतिक किर्ती लाभलेले आणि पद्मभूषण पुरस्कार प्राप्त डॉ. फारुख उद्वारिया यांच्या देखरेखीखाली लता मंगेशकर यांच्यावर उपचार केले जात आहेत. लता मंगेशकर यांना गेल्या सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा आहे.

मागच्या सोमवारी उशिरा लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. निमोनिया आणि श्वसनाचा त्रास या दोन कारणांमुळे त्यांना ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लता मंगेशकर यांची प्रकृती आता आधीपेक्षा बरीच चांगली आहे असं त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याने सांगितलं आहे. तसंच लोकांनी दिलेल्या शुभेच्छांबाबत कुटुंबीयांनी आभारही मानले आहेत.

दोन दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लता मंगेशकर यांची भेट घेतली होती. त्यांनीही ट्विट करुन दीदी लवकर बऱ्या होतील अशी भावना व्यक्त केली होती.  ‘तुमच्यातली इच्छाशक्ती आणि तमाम भारतीयांच्या प्रार्थनेचे बळ इतकं मोठं आहे की तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार आहात. आम्ही सगळेच आमच्या दीदींसाठी प्रार्थना करतो आहोत’ असं ट्विट राज ठाकरेंनी केलं होतं. आता आज लतादीदींची प्रकृती सुधारते आहे असं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे.