मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रमणियन यांचे मार्गदर्शन

मुंबई : देशातील सर्वात जुना अर्थशास्त्राचा विभाग अशी ओळख असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाला शंभर वर्ष पूर्ण झाली असून  देशाची आर्थिक विचारसरणी आणि धोरणनिर्मितीमध्ये या विभागातील विद्वानांचे मोठे योगदान आहे.

नोबेल पारितोषिक विजेते प्रा. एरिक मस्कीन यांच्या हस्ते या विभागाच्या शताब्दी वर्ष समारंभाला सुरुवात करण्यात आली होती.आताचे मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी हा मुंबई विद्यापीठाचा अर्थशास्त्र विभाग म्हणून ओळखला जात असे. विभागाच्या शताब्दीवर्षाच्या निमित्ताने देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमणियन यांच्या विशेष व्याख्यानाचे आज आयोजन करण्यात आले आहे. ‘पोस्ट कोव्हिड इकोनॉमिक रिफॉम्र्स’ या विषयावर ते बोलतील. हे व्याख्यान आभासी पद्धतीने सकाळी १०.३० वाजता होईल. कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र. कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, विभागाच्या संचालिका प्रा. डॉली सन्नी, प्रा. अभय पेठे उपस्थित राहणार आहेत.

धोरण निर्मितीमध्ये मदत

राज्य शासनाच्या सार्वजनिक धोरण निर्मितीमध्येही विभाग हातभार लावत आहे. महाराष्ट्र शासनाने मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी विभागाला रुपये २५ कोटीचे अनुदान मंजूर केले आहे. या रक्कमेतून प्राप्त होणाऱ्या व्याजातून विविध क्षेत्रातील धोरण निर्मितीसाठी हा विभाग कार्यरत आहे.