एखाद्या खटल्यात न्यायालयाने दोषी ठरवलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्यास त्याच्या वारसदारांनी न्यायालयाने ठोठावलेला दंड भरला पाहिजे. मृत व्यक्तीच्या नावावरील मालमत्तेच्या माध्यमातून हा दंड भरता येईल, असे मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणामध्ये नुकतेच स्पष्ट केले. न्यायालयाच्या या निर्णयाचा परिणाम अनेक खटल्यांवर होऊ शकतो.
मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती शालिनी फणसळकर-जोशी यांनी दिलेल्या निकालामध्ये म्हटले आहे की, एखाद्या दोषी व्यक्तीचा मृत्यू म्हणजे त्याला ठोठावलेल्या दंडापासून किंवा नुकसान भरपाईपासून त्याच्या वारसांची सुटका असा होत नाही. त्यामुळे संबंधित दंड मृत व्यक्तीच्या नावावरील मालमत्तेच्या माध्यमातून वसुल केला जाऊ शकतो.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील शमीम सरखोत यांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली एक याचिका फेटाळण्यात आली. आपल्या पतीचा मृत्यू झाला असल्याने त्यांना ठोठावण्यात आलेला दंड आपण भरू शकत नाही. आपण केवळ त्यांच्या वारस आहोत, असा युक्तिवाद सरखोत यांच्या वकिलांनी केला. पण न्यायालयाने तो फेटाळला. शमीम यांचे पती सैफुद्दिन यांनी स्थानिक व्यावसायिकाला दिलेला एक चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी स्थानिक न्यायालयाने त्यांना २५ हजार रुपयांचा दंड आणि संबंधित व्यावसायिकाला २.८५ लाख रुपये देण्याचा आदेश दिला होता. स्थानिक न्यायालयाच्या आदेशाला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावरील सुनावणी प्रलंबित असतानाच सैफुद्दिन यांचा मृत्यू झाला होता.