09 August 2020

News Flash

सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पात क्षमतेपेक्षा कमी वाघ

पुरेसे भक्ष्य, वन्यजीव कॉरिडॉरच्या अभावामुळे व्याघ्रसंख्या मर्यादित

(संग्रहित छायाचित्र)

सुहास जोशी

देशातील व्याघ्र गणनेत वाघांची संख्या १६ टक्क्य़ांनी वाढल्याचे आणि अधिवासामध्ये २२ टक्क्य़ांची घट झाल्याचे निष्पन्न झाले असले तरी सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पात मात्र अधिवासाच्या क्षमतेपेक्षा वाघांची संख्या कमी आहे.

विदर्भाबाहेरील महत्त्वाकांक्षी सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांसाठी पुरेसे भक्ष्य नसणे, बफर क्षेत्रफळापेक्षा कोअर भागाचे क्षेत्रफळ जास्त असणे आणि वाघांची संख्या जास्त असणाऱ्या कर्नाटकच्या सीमेवरील जंगलांशी योग्य असा वन्यजीव कॉरिडॉर विकसित नसणे इत्यादी कारणांमुळे सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या कमी आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. चांदोली राष्ट्रीय अभयारण्य आणि कोयना वन्यजीव अभयारण्य या दोहोंचा एकत्रित सह्य़ाद्री व्याघ्रप्रकल्प २०१० मध्ये घोषित करण्यात आला. मात्र आजही या व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या संख्येबाबत आक्षेप घेतले जातात. केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने केलेल्या २०१८च्या व्याघ्र प्रकल्प प्रभावी व्यवस्थापन मूल्यमापनात सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या संख्येवर शंका उपस्थित करण्यात आली होती. तसेच चांदोली, राधानगरी भागातील बॉक्साइटच्या खाणींवरही आक्षेप घेण्यात आले होते.

‘सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पात मुळातच वाघांची संख्या कमी आहे. वाघांचे मूळ ठिकाण तिलारी जंगलात आहे. त्यामुळे सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढवण्यासाठी आधी तिलारीला अभयारण्याचा दर्जा द्यावा लागेल. तसेच तिलारी-राधानगरी-चांदोली हा वन्यजीव कॉरिडॉर सुरक्षित होण्याची गरज आहे. तरच तिलारी येथील प्रजननक्षम वाघिणी सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पात येऊ शकतील,’ असे वन्यजीवतज्ज्ञ किशोर रिठे यांनी सांगितले.

किशोर रिठे यांनी सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पाच्या सीमा निश्चित करण्याच्या समितीत काम पाहिले होते. ‘वन्यजीव अभयारण्यांच्या सीमा निश्चिती, क्षेत्रफळ विकास करताना शास्त्रीय दृष्टिकोनापेक्षा राजकीय दृष्टिकोन अधिक प्रभावी ठरत असल्याचे ते सांगतात. त्याचबरोबर कोयनेचे बफर क्षेत्र आणखीन वाढवणे गरजेचे असल्याच्या मुद्दय़ावर ते भर देतात.

व्याघ्रगणना अहवालात त्रुटी

  • जुलैच्या अखेरीस २०१८ च्या व्याघ्रगणना अहवालात प्रत्येक अभयारण्यानुसार वाघांची संख्या दिलेली नाही. मात्र वाघांच्या संख्येची घनता दर्शविणारे बिंदू विशिष्ट रंगात दिले आहेत.
  • घनतेनुसार रंगाचा गडदपणा वाढतो. सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पातील बिंदूचा रंग अत्यंत फिकट दर्शविण्यात आला आहे. कोअर क्षेत्रफळ ६००.१२ चौ. किमी, बफर क्षेत्रफळ ५६५.४५ चौ. किमी. आहे.

सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या अधिवासाच्या क्षमतेपेक्षा कमी आहे. येथील वाघांसाठी भक्ष्य वाढवणे गरजेचे आहे. सांबरांची संख्या या जंगलात वाढायला हवी. ती वाढली तर वाघांची संख्या वाढू शकेल. चांदोली ते तिलारी हा कॉरिडॉर प्रस्तावित असून, त्याबाबत काम सुरू आहे.

– नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2019 2:03 am

Web Title: less than capable in the sahyadri tiger project abn 97
Next Stories
1 दोन महिन्यांत ९ हजार फेऱ्या रद्द
2 खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा पेव्हर ब्लॉकच
3 विकास करारासाठी १००० रुपये
Just Now!
X