दोन सज्ञान व्यक्तींनी परस्पर संमतीने ठेवलेले समलैंगिक संबंधांना सुप्रिम कोर्टाने मान्यता दिली होती. त्यामध्ये कलम 377 अंतर्गत गुन्हा नसल्याचा निर्वाळा कोर्टाने दिला होता. त्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत जाहीरपणे समलैंगिक लग्न पार पडले. रेनबो व्हॉइस या संस्थेचे संस्थापक विनोद फिलीप (४३) आणि विन्सेंट (४७) या दोघांनी या सोहळ्यात लग्नगाठ बांधली. या सोहळ्यासाठी एलजीबीटी समूहातील अनेक दिग्गज सहभागी झाले होते.

विनोद फिलीप हा दक्षिण भारतातील असून त्याचा ख्रिस्ती कुटुंबात जन्म झाला. विन्सेंट हा मूळचा फ्रान्सचा असून या दोघांची पॅरिसमध्ये एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून ओळख झाली होती. सहा महिने डेटिंग केल्यावर आयुष्य सोबत घालवायचा निर्णय त्यांनी घेतला होता. विनोदने जेव्हा विन्सेंटबद्दल घरी सांगितलं तेव्हा त्याला घरातून प्रचंड विरोध झाला होता, पण नंतर त्यांनी विन्सेंटला स्वीकारले. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात फ्रान्समध्ये त्यांनी लग्न केलं होतं. त्यानंतर आता मुंबईतील एका हॉटेलमध्ये रिसेप्शनचे आयोजन केले होते.

यावेळी या दोघांचेही मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. विनोद यांनी चेन्नईमधून मुंबईत येत एलजीबीटी समुदायासाठी काम करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ते नंतर बराच काळ मुंबईत राहीले. २०१६ मध्ये या दोघांची एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून पॅरिसमध्ये ओळख झाली होती. चॅटिंग करता-करता दोघांनी डेटिंग सुरु केलं. सहा महिन्यांनंतर ते दोघं एकत्र राहायला लागले. त्यानंतर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात बुडाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, हा समलैंगिक विवाह असल्याची माहिती अखेरच्या क्षणापर्यंत हॉटेल व्यवस्थापनापासून लपवण्यात आली होती. मात्र नंतर हॉटेल व्यवस्थापनाने याबाबत माहिती देण्यात सहकार्य केले.