दहा ते बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर मॉन्सून पुन्हा एकदा कोकण किनारपट्टीवर सक्रीय झाला. रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. संततधार पावसाने जिल्ह्यातील आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे नागोठणे शहराला पहाटे पुराचा तडाखा बसला.

शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ९८ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. पेण, कर्जत, खालापूर, सुधागड, माणगाव, महाड पोलादपूरसह माथेरान परिसराला पावसाने झोडपून काढले. पेण येथे २४० मिमी, कर्जतमध्ये २३६ मिमी, माथेरानमध्ये १९९ मिमी, सुधागड येथे १५५ मिमी, खालापूर येथे १४४ मिमी तर रोहा येथे ९६ मिमी पावसाची नोंद झाली. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली. आंबा नदीने पहाटे पाचच्या सुमारास धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे नागोठणे शहराला पुराचा तडाखा बसला. एसटी स्थानक परिसर, कोळीवाडा परिसर, मरिआई मंदिर परिसरात एक ते दोन फुट पाणी भरले होते. बाजारपेठ परिसरातील सखल भागात पाणी शिरण्यास सुरवात झाली होती. पेण- नागोठणे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला होता. मात्र पावसाचा जोर ओसरल्याने सकाळी आठच्या सुमारास पुराचे पाणी ओसरण्यास सुरवात झाली.

कर्जत तालक्यातील सखल भागात ठिकठिकाणी मोठ्याप्रमाणात पाणी साचले. त्यामुळे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. अलिबाग परिसरात विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत होता. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडणे, घरांची पडझड होणे यासारख्या घटना घडल्या. दरम्यान येत्या २४ तासांत जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.