मालकासह दोघांना अटक, सात कोटींचे एमडी जप्त

बदलापूर एमआयडीसीतील श्री शारदा केमिकल्स या कारखान्यावर छापा घालून तब्बल सात कोटी किमतीचे द्रव मेफ्रेडॉन(एमडी अमली पदार्थ) हस्तगत केल्याची माहिती अंबोली पोलिसांनी दिली. गेल्या काही महिन्यांपासून कारखान्यात रसायन निर्मितीआड एमडीचे उत्पादन घेतले जात होते, असा दावा पोलीस करतात. या प्रकरणी कारखान्याचे मालक नारायणभाई पटेल (७४) यांच्यासह दोघांना पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या असून त्यांच्याकडे अन्य साथीदार, वितरणसाखळीबाबत चौकशी सुरू आहे.

१३ एप्रिलला अंबोली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दया नायक आणि पथकाने शाहीर शाह या तरुणाला ३०० ग्रॅम एमडीसह अटक केली. शाहच्या चौकशीतून बदलापूर येथील शारदा केमिकल्सची माहिती पथकाला मिळाली. या कारखान्यात द्रव स्वरूपात एमडी तयार केले जाते. वितरक द्रव स्वरूपातले एमडी या कारखान्यातून घेऊन जातात आणि त्यावर पुढील प्रक्रिया करून एमडीची पूड मिळवतात, या माहितीच्या आधारे नायक आणि पथकाने कारखान्यावर छापा घातला. तेव्हा तेथे ७५ लिटर द्रव स्वरूपातील एमडी आढळले. त्यानुसार मालक पटेल यांना अटक केली गेली. पटेल रसायनशास्त्राचे पदवीधर असून रसायन निर्मितीत माहीर आहेत. त्यामुळे एमडी तयार करण्यासाठी आवश्यक असलेली विविध कच्ची रसायने, नेमक्या प्रमाणात, नेमक्या पद्धतीने त्यांचे मिश्रण पटेल यांना अवगत असल्याचे, पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले. पटेल यांचे साथीदार, कारखान्यात केव्हापासून एमडी तयार करण्यास सुरुवात झाली, पटेल ते शाह यांच्यामधली वितरण साखळी अशी माहिती पोलीस मिळवत आहेत. दरम्यान, पुरावे नष्ट होऊ नयेत या उद्देशाने कारखान्याला टाळे ठोकले.

सहा कोटींचे हेरॉईन हस्तगत

मुंबई : राजस्थानातून मुंबईत हेरॉईनचा साठा घेऊन आलेल्या मांगिलाल मेघवाल (४०) या तरुणाला अमली पदार्थविरोधी पथकाने शनिवारी माटुंगा परिसरातून अटक केली. अटक आरोपीकडून सुमारे चार किलो हेरॉईन हस्तगत करण्यात आले. हा साठा आंतराष्ट्रीय बाजारपेठेत सहा कोटी रुपयांना विकला जाईल, असे पथकाकडून सांगण्यात आले.

हेरॉईनचा मोठा साठा वितरणासाठी माटुंगा येथील टी. एच. कटारिया मार्गावर येणार, अशी माहिती पथकाच्या वांद्रे कक्षाचे प्रभारी निरीक्षक अनिल वाढवणे यांना खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून मेघवाल याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या झडतीत ४ किलो १०० ग्रॅम हेरॉईन आढळले. अफगाणिस्तान हे हेरॉईन उत्पादनाचे जगातले सर्वात मोठे केंद्र आहे. तेथून पाकिस्तानमार्गे राजस्थान आणि तेथून हेरॉईनचा प्रवास देशाच्या कानाकोपऱ्यांत होतो. तसेच बांगलादेश, पश्चिम बंगालमार्गे हेरॉईन भारतात येते. याशिवाय देशात ज्या ज्या ठिकाणी सरकारमान्य अफू शेती केली जाते त्या त्या ठिकाणी थोडय़ा फार प्रमाणात हेरॉईनची निर्मिती चोरीछुपे केली जाते. या कारवाईत हस्तगत केलेले हेरॉईन सीमेपलीकडून आले की देशात तयार केले गेले हे जाणून घेण्यासाठी पथकाकडून आरोपी मेघवाल याची कसून चौकशी सुरू आहे.

आतापर्यंतच्या चौकशीत मेघवाल हा साठा दक्षिण मुंबईतल्या वितरकाला देणार होता. तसेच हे हेरॉईन मुंबईतल्या मुंबईतच विकले जाणार होते, अशी माहिती पथकाच्या हाती लागली आहे. पथकाकडून दक्षिण मुंबईतल्या वितरकाबाबत माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे.