मध्य रेल्वेच्या मोटरमनची ‘कामगिरी’

प्रवाशांच्या सुरक्षेबाबतचे प्रश्नचिन्ह कायम

मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे गार्डने गाडी चालवून गाडी प्लॅटफॉर्मवर चढवल्याची घटना ताजी असतानाच हाती आलेल्या आकडेवारीनुसार मध्य रेल्वेच्या मोटरमननी गेल्या नऊ महिन्यांत नऊ वेळा लाल सिग्नल मोडून गाडी पुढे नेल्याचे समोर आले आहे. रेल्वे वाहतुकीत लाल सिग्नलचे महत्त्व लक्षात घेता ही गंभीर बाब मानली जात असून या घटनांमुळे दरमहा सरासरी एकदा प्रवासी सुरक्षा कमालीची धोक्यात असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत अशा घटनांमध्ये घट झाल्याचेही दिसून येत आहे.
धोकादायक पद्धतीने सिग्नल ओलांडणे किंवा चुकवणे (सिग्नल पास्ड अ‍ॅट डेंजर किंवा स्पॅड) ही रेल्वेच्या वाहतुकीत अत्यंत गंभीर बाब मानली जाते. त्यासाठी लोको पायलट (इंजिन चालक) किंवा मोटरमन यांना कठोर शिक्षाही ठोठावली जाते. अनेकदा अशा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाईही होते. लाल सिग्नल दिसत असतानाही तो ओलांडून गाडी पुढे नेणे, हे प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीनेही धोक्याचे असल्याने रेल्वे प्रशासनाने त्याबाबत कठोर नियम बनवले आहेत. साधारणपणे इंजिन चालकासह साहाय्यक असल्याने लांब पल्ल्याच्या गाडय़ांबाबत या घटना खूप कमी वेळा घडतात.
मात्र मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमार्गावर एप्रिल महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत तब्बल नऊ वेळा अशा घटना घडल्याने प्रवासी सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘स्पॅड’बरोबरच गाडी एखाद्या नियोजित स्थानकात न थांबवण्याच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे सूत्रांकडून समजते. गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत अशा ११ घटना घडल्या होत्या. त्यामुळे यंदा हे प्रकार कमी झाले असले, तरी त्यांचे प्रमाण चिंताजनक असल्याची कबुली रेल्वे अधिकारीच देतात.

या घटनांना ‘स्पॅड’ म्हणणे चुकीचे!
गाडी सोडण्याआधी गार्ड आणि मोटरमन यांच्यात संकेतांद्वारे संवाद होत असतो. मात्र अनेकदा प्रवासी मोटरमनला काही विचारतात. त्यामुळे मोटरमनचे लक्ष विचलित होते. अशा वेळी गार्डने दिलेला संकेत ऐकून मोटरमन सिग्नलबाबत खातरजमा न करता गाडी सोडतो. किंवा स्थानकात शिरताना गाडीचा वेग ताशी ३० किमी असावा, असा नियम आहे. तो नियम पाळूनही वेळेत ब्रेक लावूनही खराब यंत्रणेमुळे गाडी सिग्नलपुढे जाऊन थांबते. अशा वेळी त्यात मोटरमनची चूक आहे असे म्हणता येणार नाही. परिणामी एकटय़ा मोटरमनला दोषी ठरवण्याऐवजी अधिकाऱ्यांनाही या घटनेचा जाब विचारायला हवा. – वेणू नायर,
महामंत्री (नॅशनल रेल्वे मजदूर युनियन)