|| संतोष प्रधान

राज्य काँग्रेसचे प्रमुख अशोक चव्हाण यांची इच्छा नसतानाही त्यांना पुन्हा लोकसभेची निवडणूक लढविण्यास पक्षाने भाग पाडले आहे. राज्यात काम करण्याची इच्छा असलेल्याला दिल्लीत पाठव तर दिल्लीत रमलेल्याला राज्यात पाठव, अशी काँग्रेसजी जुनीच कार्यपद्धती आहे.

नांदेडमधून पत्नी अमिता चव्हाण यांना उमेदवारी द्यावी, अशी अशोक चव्हाण यांची मागणी होती. तसा प्रस्ताव काँग्रेस समितीने दिल्लीला पाठविला होता, कारण अशोकरावांना पुन्हा मुंबईत परतण्याचे वेध लागले आहेत. यदाकदाचित राज्यात सत्ताबदल झालाच तर आपण आमदार असलेले बरे हा त्यामागचा उद्देश होता. पण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अशोकरावांना मुंबईऐवजी दिल्लीतच पसंती दिली आहे. अशोकरावांचा नाइलाज झाला.

अशोकरावांचे वडील शंकरराव चव्हाण यांनाही असाच अनुभव आला होता. १९८७ मध्ये त्यांना दिल्लीतून मुंबईत मुख्यमंत्री म्हणून पाठविण्यात आले. शरद पवारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर शंकररावांची फारशी इच्छा नसतानाही त्यांना मुख्यमंत्रिपद सोडून पुन्हा दिल्लीत जावे लागले होते.

वसंतदादा पाटील यांच्याबाबतीतही हेच घडले. दादांना अनिच्छेनेच दिल्लीला जावे लागले होते. एकदा तर दादांना राजस्थानला राज्यपाल म्हणून धाडण्यात आले होते. दादा दिल्ली किंवा जयपूरमध्ये फारसे रमलेच नाहीत.

शरद पवार यांना पी. व्ही. नरसिंहराव यांनी दिल्लीतून असेच मुंबईला धाडले होते. १९९१ मध्ये पवारांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उडी घेतली होती. पवारांना हे पद मिळाले नाही. पण त्यांच्याकडे संरक्षण खात्याची जबाबदारी आली. मुंबईतील जातीय दंगलीनंतर सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्यात आले. तेव्हा दिल्लीत रमलेल्या शरदरावांना नरसिंहरावांच्या आग्रहाखातर नाइलाजाने मुंबईत परतावे लागले होते.

सुशीलकुमार शिंदे यांनाही दिल्लीच्या लहरी कारभाराचा फटका बसला होता. २००४ मध्ये सुशीलकुमारांच्या नेतृत्वाखाली राज्यात पुन्हा काँग्रेस सत्तेत आली. पक्षाला सत्ता मिळाल्याने पुन्हा  संधी मिळेल, अशी सुशीलकुमारांची अटकळ होती. ते मुंबईत बिनधास्त होते. दिल्लीत मात्र वेगळेच शिजत होते. मुख्यमंत्री निवडीच्या आदल्या दिवशी त्यांना याचा सुगावा लागला, पण तोपर्यंत वेळ गेली होती. सुशीलकुमारांना हैदराबादच्या बेगम पेठेतील राजभवनात राज्यपाल म्हणून पाठविण्यात आले. सुशीलकुमारांनी अनिच्छेनेच हे पद स्वीकारले होते. नंतर केंद्रात ऊर्जा आणि गृह ही महत्त्वाची खाती मिळाली, पण मुंबई सोडावी लागल्याची सल त्यांना अजूनही आहे.