शरीर साथ देत नसतानाही ज्योत्स्ना, सुमीया यांचे मतदान

मुंबई : मतदानाचा अधिकार बजावलाच पाहिजे, या ऊर्मीने भांडुपच्या ज्योत्स्ना शहा (७५) आणि विक्रोळीच्या सुमीया खान (३५) यांनी प्रतिकूल परिस्थितीत मतदान केले. शहा दोन आठवडय़ांपासून गंभीर व्याधींनी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर सुमीया अपघातात कायमच्या अधू झाल्या आहेत. दोघींची मतदानासाठीची धडपड पाहून परिसरातील मतदारांमध्ये उत्साह संचारला. या दोघी मतदानासाठी आल्या तेव्हा केंद्रावरील निवडणूक अधिकारीही थक्क झाले.

भांडुपला राहणाऱ्या शहा खासगी रुग्णालयात दाखल होत्या. सोमवापर्यंत डॉक्टर घरी सोडतील का? या एकाच प्रश्रा ने त्यांनी कुटुंबाला भांडावून सोडले होते. याआधीच्या एकाही निवडणुकीत मतदानाचा हक्क न चुकवणाऱ्या शहा यांना यंदाही तो बजावण्याची इच्छा होती. त्यांचा हट्ट पाहून मुलाने डॉक्टरांशी बोलून काही कालावधीसाठी परवानगी मिळवली. तसा शहा यांचा चेहरा खुलला. आजारपण, उपचारामुळे थकलेले शरीर, मनगटांवर सलाईन सुरू असल्याच्या खुणा घेऊनच शहा भांडुप पश्चिमेकडील कॉसमॉस शाळेतील मतदान केंद्रावर अवतरल्या. ज्येष्ठ नागरिक असल्याने पोलिसांनी त्यांना लागलीच मतदानासाठी केंद्रावर नेले. याही परिस्थितीत हक्क बजावल्याचे समाधान त्यांच्या चेहेऱ्यावर दिसत होते. एका मताने काय होणार, ही मानसिकताच चुकीची आहे. प्रत्येकाने असा विचार केला तर किती मते फुकट जातील, याचा विचार कोणीच करत नाही. एका मतात इतिहास रचण्याची ताकद आहे, अशी प्रतिक्रिया शहा यांनी माध्यमांकडे व्यक्त केली.

असाच प्रसंग विक्रोळी पश्चिमेकडील पार्कसाइट महापालिका शाळेतील केंद्रावर घडला. व्हीलचेअरवर मतदान केंद्रावर आलेल्या सुमीया खान (३५) सोमवारी सकाळपासून मतदान केंद्रावर खोळंबून होत्या. २००८मध्ये अहमदाबाद येथे त्यांना अपघात घडला. मणक्याला गंभीर इजा झाल्याने अर्धांगवायूचा झटका आला. त्यात त्यांचे दोन्ही पाय अधू झाले. त्यामुळे २००९च्या लोकसभा निवडणुकीत त्या मतदान करू शकल्या नव्हत्या. ती सल त्यांच्या मनात कायम होती. यंदा काहीही झाले तरी मतदान करायचेच, असा चंग त्यांनी बांधला होता. तसा हट्ट त्यांनी पतीकडे केला. पतीने शनिवारी सकाळी मतदान केंद्रावर जाऊन पाहाणी केली सुमीया यांचे मतदान असलेला बूथ शाळेच्या पहिल्या मजल्यावर होता. तिथवर व्हीलचेअरसह सुमीया यांना कसे न्यावे या विवंचनेत पती होता. त्याने केंद्रावरील अधिकाऱ्यांकडे मदत मागितली. अपंगांसाठीच्या हेल्पलाइनशी संपर्क साधला. तिथून प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर सुमीया यांची मतदानाची इच्छा पाहून अधिकारी, पोलिसांनी मदतीचा हात दिलाच. दुपारच्या सुमारास सुमीया यांनी मतदान केले. मतदानाचा हक्क बजावल्यासच सत्तारूढ होणाऱ्यांना जाब विचारण्याचा अधिकार आहे, याची जाणीव असल्याने हा हट्ट केल्याचे सुमीया यांनी स्पष्ट केले.  घाटकोपरच्या एका मतदान केंद्रावर सोमवारीच विवाहबद्ध झालेल्या जोडप्याने मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती निवडणूक कार्यालयातून देण्यात आली.