राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आडाखे बांधण्यात मग्न

मुंबई : उन्हाचा पारा वाढत असतानाही दक्षिण मुंबईमधील मराठी भाषकांबरोबरच अमराठी मतदारांनी सोमवारी मोठय़ा संख्येने मतदान केंद्रावर रांगा लावल्या. अमराठी मतदारांची मते नेमकी कोणाच्या पारडय़ात पडणार याचा अंदाज मात्र, शिवसेना-भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना येत नव्हता. एकूणच दक्षिण मुंबई मतदारसंघातील राजकीय रंग संभ्रमात टाकणारा होता.

शिवसेनेच्या शाखा, भाजप आणि काँग्रेसच्या कार्यालयांमध्ये रविवारी रात्री उशिरापर्यंत मतदानाचा टक्का वाढावण्यासाठी व्यूहरचना सुरू होती. नेते आणि कार्यकर्ते मंडळींनी नेमून दिलेल्या मतदार केंद्रावर सोमवारी सकाळीच धाव घेतली. काही कार्यकर्त्यांनी मतदारांच्या सुविधेसाठी बाकडी मांडली होती. मतदारांना आवर्जून बोलावून मतदान क्रमांकाची चिठ्ठी त्यांच्या हाती देत मतदान करण्याचा सौजन्यपूर्ण संदेशही ही कार्यकर्ते मंडळी देत होती. काही कार्यकर्ते मतदारसंघात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा आढावा घेत फिरत होते. शिवसेनेच्या शाखांचा परिसर गर्दीने फुलून गेला होता.

चिराबाजार, गिरगाव, ग्रॅन्ट रोड, नळ बाजार, सी. पी. टॅन्क, काळबादेवी, मलबार हिल, भायखळा, शिवडी, वरळी आदी परिसरात मोठय़ा संख्येने मतदारांनी रांगा लावल्या होत्या. काही पक्षांचे कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिकांना आधार देत मतदान केंद्रांमध्ये घेऊन येत होते. वरळी कोळीवाडय़ाच्या मतदान बहिष्काराची एक बाब वगळता मतदान शांततेत पार पडले.

मशीद बंदर स्थानकाजवळील जनाबाई अ‍ॅण्ड माधवराव रोकडे शाळेत उद्वाहनाची सोय नसल्याने तसेच पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर मतदान केंद्र असल्याने भर उन्हातून शाळा गाठून पुन्हा पायऱ्या चढण्याची कसरत मतदारांना करावी लागली. ज्येष्ठांना रांगेशिवाय थेट प्रवेश दिला जात होता. मात्र, अन्य काही सोय नसल्याने पहिल्या वा दुसऱ्या मजल्यावरील मतदार केंद्र गाठणे त्यांना त्रासदायक होत होते.

मतदान यंत्रांत तांत्रिक बिघाड

दक्षिण मुंबई मतदारसंघातील मलबार हिल परिसरातील एका मतदान केंद्रावरील मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तात्काळ यंत्राची तपासणी करून हे मतदान यंत्र बदलण्यात आले. मात्र बिघडलेल्या मतदान यंत्रांवर नोंदवलेल्या मतांचीही मोजणी करण्यात येईल, असे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.