बोरिवलीकरांसाठी आज ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ गुंतवणूकपर मार्गदर्शन उपक्रम

२८ हजारांच्या आसपास अडकणाऱ्या सेन्सेक्समध्ये लवकरच मोठी आपटी येणार अशी बाजारवर्तुळात चर्चा असताना ती नेमकी कधी? व अशा स्थितीची वाट पाहून बाजारातील कमी मूल्याचे समभाग खरेदी करावे किंवा काय? अर्थसंकल्पानंतरची वित्त वर्षांची पहिली तिमाही संपली म्हणून आर्थिक नियोजन आणखी पुढे ढकलावे काय? नजीकच्या भविष्यातील आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजन कसे करावे? आदी प्रश्नांची उकल शनिवारी बोरिवलीत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रमाच्या माध्यमातून होत आहे.

‘दिशा डायरेक्ट’ प्रस्तुत या उपक्रमाचे सहकार क्षेत्रातील अग्रणी ‘टीजेएसबी बँक’ ही बँकिंग पार्टनर आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. तसेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव आहेत.

बाजारातील गुंतवणुकीबाबत कोणते धोरण अवलंबवावे, हे ‘लोकसत्ता’चे प्रसिद्ध स्तंभलेखक अजय वाळिंबे हे सांगतील. ‘शेअर्समधील गुंतवणुकीची योग्य वेळ’ या त्यांच्या यानिमित्ताने होणाऱ्या मार्गदर्शनात कंपन्या व त्यांचे भविष्य, समभाग व त्यांचे मूल्य आदीबाबत अधिक स्पष्ट मते मांडली जातील.

स्थिर उत्पन्न देणाऱ्या व भरवशाच्या मानले जाणाऱ्या पारंपरिक बचतीच्या योजनांवरील व्याजदर दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे, असे सध्याचे चित्र आहे. त्याचबरोबर मौल्यवान धातू व स्थावर मालमत्तेतील गुंतवणुकीतून गेल्या काही वर्षांपासून आकर्षक परतावा मिळत नसल्याची आकडेवारी समोर येत आहे. असे असताना गुंतवणुकीसाठी, बचतीसाठी कोणते मार्ग अनुसरावे? त्यासाठीचे आर्थिक नियोजन कसे करावे असे सारे सनदी लेखाकार तृप्ती राणे या सोदाहरणासह सांगतील. ‘अर्थनियोजनाचा श्रीगणेशा’ या विषयाद्वारे त्या याबाबत अधिक भाष्य करतील. गुंतवणूकदारांना बचतीबाबतच्या शंका उपस्थित तज्ज्ञांना विचारण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तज्ज्ञही त्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न आपल्या मार्गदर्शनाद्वारे करतील.

  • कधी : शनिवार, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता
  • कुठे : सेंट अ‍ॅन्स हायस्कूल, लोकमान्य टिळक मार्ग, बोरिवली (पश्चिम).