‘ब्लॉग बेंचर्स’चा ताजा विषय : ‘अतिशहाणे वि. अर्धवट’
हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुलाचे प्रकरण ताजे असतानाच आता जेएनयूमधील वादाने सरकारचे राजकीय शहाणपण उघडे पडले आहे या संदर्भात ‘लोकसत्ता’त १५ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘अतिशहाणे वि. अर्धवट’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.
प्रस्थापितविरोधी भूमिका घेऊ पाहणाऱ्या सरकारने जेएनयूमधील विद्यार्थ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून डोकेदुखी ओढवून घेतली. तेथील विद्यार्थ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून हा प्रश्न सरकारने नको इतका चिघळवला असल्याचे परखड मत या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. विचारयुद्धास केवळ सशक्त प्रतिविचार मांडूनच जिंकता येते. पण या विचारयुद्धांच्या लढाईत एक बाजू अतिशहाणी तर दुसरी अर्धवट आहे असे मत अग्रलेखात मांडण्यात आले आहे. या अग्रलेखावर या आठवडय़ाच्या ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये विद्यार्थ्यांना भूमिका मांडायची आहे.
याच विषयावर सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्र आणि सार्वजनिक प्रशासन विभागाचे प्राध्यापक सुहास पळशीकर यांचे मत ‘लोकसत्ता’ने जाणून घेतले. या दोघांनीही या विषयाचा विविध दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आढावा घेतला. त्यांच्या मांडणीचा विद्यार्थ्यांना भूमिका सुस्पष्टपणे मांडण्यास उपयोग होईल.
वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉग बेंचर्स’ या लेखन स्पर्धेचा हा सहावा लेख आहे. आर्थिक सुधारणा, क्रिकेट, पर्यावरण, उद्योग, जातीयवाद या विषयांवर प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखांवर विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला.

लक्षात ठेवावे असे..
* या स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे आहे.
* मते नोंदविण्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ.
* indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळावर स्पर्धेतील सहभागासंबंध माहिती उपलब्ध.
* नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉगइन करून विद्यार्थ्यांना आपले भूमिका मांडता येते.
* ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते.
* किमान २५० शब्द व मराठीतील लेखनाचाच स्पध्रेसाठी विचार केला जाईल.
* सहभागी होताना अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.