कोपर्डीत झालेल्या बलात्काराच्या गंभीर घटनेनंतर एकंदर सध्याच्या समाज वास्तवावर ‘सडके पौरुष’ या अग्रलेखात बोट ठेवण्यात आले होते. व्यवस्थाशून्य समाजात कायदे तोडणाऱ्यांना समाजही नायकत्व देतो. तेव्हा अशा समाजात बलात्कारी वृत्ती वाढण्याची शक्यताच अधिक असते. असे स्पष्टपणे मांडणाऱ्या ‘सडके पौरुष’ या अग्रलेखावर व्यक्त होणारी नाशिकच्या के.टी.एच.एम. महाविद्यालयाची विद्यार्थिनी विशाखा ठाकरे ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत पहिल्या पारितोषिकाची विजेती ठरली. तर, या स्पर्धेत मुंबईच्या ‘किर्ती महाविद्यालय’चा विद्यार्थी अक्षय खुडकर याने दुसरे पारितोषिक पटकावले आहे.

कायदा मोडणे हे आपल्या इथे पुरुषार्थाचे लक्षण मानले जाते. स्वत:शिवाय प्रत्येकाचे स्वातंत्र्य जपण्याची जबाबदारीही आपल्यावरच येते, याचे भान सुटू लागले की, कायदेभंगात शौर्य मानणाऱ्या शक्ती डोके वर काढू लागतात. यातूनच बलात्कार, अत्याचार करणाऱ्यांनाही ताकद मिळू लागते. कोपर्डीत झालेल्या बलात्कराच्या भीषण घटनेनंतर या सामाजिक परिस्थितीचे दाहक वर्णन ‘सडके पौरुष’ या अग्रलेखात करण्यात आले होते. या अग्रलेखावर विशाखा व अक्षय यांनी आपली मते ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत मांडली. विशाखाला सात हजार रुपये आणि प्रमाणपत्र तर अक्षयला पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार असून या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते गौरविण्यात येईल. या स्पध्रेत मत नोंदविलेल्या विद्यार्थ्यांपैकी जत, शेरगाव येथील आर. आर. महाविद्यालयाची विद्यार्थिनी जास्वंदी वानखेडे, सांगलीच्या नारायणदास सर्वोत्तमदास सोती विधि महाविद्यालयाचा विद्यार्थी योगेश नाडकर्णी, लातूरच्या दयानंद विधि महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रतीक्षा यादव, मुंबईतील सरकारच्या विधि महाविद्यालयाची विद्यार्थिनी अंकिता राजे आणि मुंबईतीलच साठय़े महाविद्यालयाची विद्यार्थिनी अश्विनी सागळे यांची मते विशेष उल्लेखनीय आहेत. महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला आहे. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच, विद्यापीठांचे व प्राचार्याचे मोलाचे सहकार्य स्पर्धेला दिले आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.