गुलजार : कोई बात चलें..

‘यार, सर्द सन्नाटा हैं तनहाई हैं

कुछ बात करो..’

असे हार्दिक आवाहन करणारे गुलजार.. हृदयात त्या फुरसतीच्या रातदिनाची आस जागवणारे गुलजार.. आणि ‘कैसे चुपचाप मर जाते हैं कुछ लोग यहाँ’ असे म्हणत सामाजिक वास्तवावर नेमके बोट ठेवणारे गुलजार.. कवी गुलजार, गीतकार गुलजार. अनेकांच्या ओळखीचे गुलजार. पण या ओळखीच्याही पलीकडचे, रावीपारचे एक गुलजार आहेत. त्या संवेदनशील लेखकाशी, जीवनाच्या मार्मिक भाष्यकाराशी गप्पा मारण्याची संधी आपणांस मिळणार आहे ‘लोकसत्ता गप्पां’च्या नव्या पर्वातून.

दैनंदिन वृत्तव्यवहाराच्या पलीकडे जाऊन विचारांच्या नवनव्या दिशांचा शोध घेण्यासाठीचा वाचकस्नेही संवादसेतू असा हा ‘लोकसत्ता गप्पा’ उपक्रम. ख्यातकीर्त साहित्यिक एस. एल. भैरप्पा, ज्येष्ठ गायक-संगीतज्ञ-लेखक पं. सत्यशील देशपांडे, भारतीय अभिजात संगीतात स्वतचा सर्जनशील ठसा उमटविणारे पं. मुकुल शिवपुत्र, प्रतिभावंत लेखक-शायर जावेद अख्तर, बुद्धिमंत कलावंत नसरुद्दीन शहा अशा मातब्बर अवलियांनी आपल्या गप्पांनी उंच नेलेल्या या उपक्रमात यावेळी गुलजार यांच्याशी संवाद साधण्याची संधी निमंत्रित वाचकांना मिळणार आहे. येत्या शनिवारी, २१ एप्रिल रोजी मुंबईत होणाऱ्या या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे या सोहळ्यात कवी गुलजार यांच्या शायरीबरोबरच, किंबहुना त्याऐवजी आपणांस भेटतील त्या त्यांच्या कथा, त्यांचे ललितगद्य आणि त्याहून अधिक म्हणजे त्यांचे त्यांच्या कवितांतून उलगडत जाणारे जीवनभाष्य.

या ‘गुलजार : कोई बात चलें..’ या शब्दगप्पांचे सहप्रायोजक केसरी टुर्स असून, बॅँकिंग पार्टनर जनकल्याण सहकारी बॅँक लिमिटेड आहे.