‘लोकसत्ता गप्पा’मध्ये चित्रकार सुभाष अवचट यांचे परखड निरीक्षण

चित्रकार समाजात शैलीनुसार वर्णव्यवस्था निर्माण झाली असून आम्ही एकत्र नाही. त्यामुळे  समाजात कलाजाणिवा वाढविण्यात आम्ही कमी पडतो. आपल्याकडील कलाजाणिवांच्या प्रसारातील मर्यादा या चित्रकला तसेच चित्रकारांबाबतच्या अनास्थेला कारणीभूत आहेत,  असे रोखठोक मत ज्येष्ठ चित्रकार सुभाष अवचट यांनी शनिवारी ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमात व्यक्त केले.भेटलेल्या व्यक्ती, अनुभवांतून एरवी कॅनव्हासवर उतरणारे विविध रंग शब्दांत उतरले आणि ज्येष्ठ चित्रकार, लेखक सुभाष अवचट यांच्यासह ‘लोकसत्ता गप्पां’ची ही मैफल रंगली. किस्से आणि मिश्किल शेरेबाजीबरोबरच चित्रकलेबाबतच्या जाणिवांचा अभाव आणि चित्रकारांमधील वर्णव्यवस्थेवर परखड भाष्यही अवचट यांनी केले तेव्हा उपस्थित अंतर्मुखही झाले.

दैनंदिन वृत्तव्यवहाराच्या पलिकडे जाऊन विचारांच्या नव्या दिशांचा शोध घेणाऱ्या  या ‘लोकसत्ता गप्पा’ उपक्रमांत या अवलिया कलाकाराला बोलते केले प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी. भेटलेल्या आणि भिडलेल्या माणसांशी आणि मातीशी नाळ जोडणाऱ्या चित्रकृतींची निर्मिती करणाऱ्या, चेहऱ्यांमागील भाव कॅनव्हासवर उतरवणाऱ्या, कधी शांततेच्या शोधात निघणाऱ्या या चित्रकाराच्या मुक्त संवादाचा प्रवाह चित्ताकर्षक होता. अगदी शिक्षण कसले घ्यावे या प्रश्नात अडकलेला विद्यार्थी ते जागतिक किर्तीपर्यंत पोहोचलेला चित्रकार, हा अवचट यांचा प्रवास उलगडताना त्यांनी मांडलेले चित्रकलेचे तत्त्वज्ञानही श्रोत्यांच्या जाणिवा समृद्ध करून गेले.

चित्रकला आणि एकूणच कला जाणिवांबाबत असलेल्या सामाजिक उदासीनतेवर भाष्य करताना अवचट म्हणाले, ‘आपल्या देशात मुळात कलाजाणीव आहे का, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. चित्र पाहण्यासाठी त्याचे व्याकरण समजायलाच हवे असे नाही. मात्र त्यासाठीची सौंदर्यदृष्टी, विचार हवा. परंतु आपल्याकडे कलांबाबत एवढी अनास्था आहे की सौंदर्यदृष्टी तयारही होत नाही. मुलांना आपण चित्र दाखवतो का, त्यांच्या दृष्यजाणिवा समृद्ध करतो का, हा प्रश्न प्रत्येक पालकाने आणि व्यवस्थेनेही स्वत:ला विचारावा. प्रत्येकाच्या अंगी कला आहे, त्याची निसर्गदत्त जाणीव आहे. मात्र त्याला आपण कधीही वाव देत नाही. परदेशांत कलाकाराला जो आदर मिळतो तसा इकडे दिसत नाही किंवा चित्रकला हा संस्कृतीचा अविभाज्य भाग होत नाही.’

चित्रकलेच्या शिक्षणाबाबत असंतोष व्यक्त करताना चित्रकलेचे औपचारिक शिक्षण बंद करा किंवा चित्रकारांना आधी अर्थाजन होऊ शकेल, असे नव्या क्षेत्रांचे शिक्षण द्या,’ असे मत अवचट यांनी व्यक्त केले. केसरी टूर्स या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते.