राज्यभरातील शंभराहून अधिक महाविद्यालयांच्या एकांकिका, शंभराहून अधिक लेखक, दिग्दर्शक आणि शेकडो कलाकार यांची गेल्या दोन महिन्यांपासूनची प्रतीक्षा आज, रविवारी संपणार आहे. पुण्याच्या नू.म.वि. शाळेत सादर होणाऱ्या पहिल्या एकांकिकेने सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची नांदी होईल. पुढील २१ दिवस महाराष्ट्रभरात होणाऱ्या या नाटय़जागरासाठी अनेक दिग्गजांची मांदियाळी परीक्षक म्हणून लाभली आहे. टॅलेंट पार्टनर असलेल्या आयरिस प्रॉडक्शन्सतर्फे अनेक ख्यातनाम कलाकार स्पर्धेतील होतकरू कलाकारांची पारख करण्यास सज्ज आहेत. अस्तित्व संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिके’साठी इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रायोजक म्हणून झी मराठीची साथ मिळाली आहे.
‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा आठ केंद्रांवर होणार आहे. तीन टप्प्यांत रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी नाटय़, चित्रपट आणि मालिका या क्षेत्रांमधील ४०हून अधिक दिग्गज परीक्षण करणार आहेत. यात शांता गोखले, नागराज मंजुळे, अशोक पाटोळे, देवेंद्र पेम, अशोक समेळ, कमलाकर नाडकर्णी, आनंद म्हसवेकर, अभिराम भडकमकर, संजय जीवने, मकरंद खेर, पी. डी. कुलकर्णी, गौरी लागू अशा अनेक नामवंतांचा समावेश आहे.
मुंबईत २० डिसेंबर रोजी रंगणाऱ्या महाअंतिम फेरीसाठी नाटककार शफाअत खान, अष्टपैलू आणि अभ्यासू दिग्दर्शक विजय केंकरे, नाटकाबरोबरच चित्रपटासारख्या वेगळ्या माध्यमावरही हुकुमत गाजवणारे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, नेपथ्याला एक वेगळी ओळख देणारे आणि आपल्या नेपथ्याचा वेगळा ठसा उमटवणारे प्रदीप मुळ्ये या मान्यवरांसह इतर दिग्गज परीक्षक म्हणून काम पाहतील. महाअंतिम फेरीचे प्रक्षेपण झी मराठीवरील ‘नक्षत्र’ या कार्यक्रमातही पाहता येणार आहे. स्पर्धेची माहिती indianexpress-loksatta.go-vip.net/lokankika या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.