सर्जनशील तरुणाईचा उत्साह, ताकदीच्या संहिता आणि कसदार अभिनय यांमुळे गाजलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या ठाणे विभागाची अंतिम फेरी आज, शनिवारी पार पडत आहे. गेल्या शनिवारी झालेल्या प्राथमिक फेरीत पात्र ठरलेल्या पाच एकांकिकांतून एका एकांकिकेची महाअंतिम फेरीसाठी निवड होणार असल्याने कोणते महाविद्यालय ठाण्यातून मुंबई गाठते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘भारतीय आयुर्विमा महामंडळा’च्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या ठाणे विभागाची अंतिम फेरी गडकरी रंगायतन नाटय़गृहात सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. या फेरीत पनवेलच्या सी. के.टी. महाविद्यालयाची ‘माणसापरीस मेंढरं बरी’, वसईच्या सेंट गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाची ‘कुछ तो मजा है’, कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयाची ‘अर्ध भिजलेली दोन माणसं’, उल्हासनगरच्या सी. एच.एम. महाविद्यालयाची ‘मढ वॉक’ आणि ठाण्याच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयाची ‘मोजलेम’ या एकांकिका सादर केल्या जातील. प्रख्यात दिग्दर्शक आनंद म्हसवेकर, लेखक-दिग्दर्शक अशोक समेळ आणि निर्माते देवेंद्र पेम हे विभागीय फेरीत परीक्षकाची भूमिका बजावतील. ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिके दिली जातील.  ही स्पर्धा ‘अस्तित्व’ संस्थेच्या सहकार्याने होत असून झी मराठी या स्पर्धेचे इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रायोजक आहेत.