वाशीत ‘लोकसत्ता’ मार्ग यशाचा; समुपदेशक व तज्ज्ञांकडून ३ व ४ जूनला मार्गदर्शन
विज्ञान म्हटले की पहिल्यांदा वैद्यकीय आणि अभियांत्रिकीला जाणार का? अशा प्रश्न विचारला जातो. आता तर नीट, जेईई, सीईटीमुळे प्रवेशाची प्रक्रियाही जटिल झाली आहे, परंतु विज्ञान विषयातूनच पर्यावरणशास्त्र, भूगर्भशास्त्र, जैवसांख्यिकी, फॉरेन्सिक सायन्स अशा कितीतरी विषयांमधील करिअरच्या वाटा खुल्या होतात हे फारसे कुणाला माहीत नसते. या वाटा चोखळणाऱ्या पदवीधरांना नोकरीच्या बाजारात पुरेशी संधीही असते, परंतु अनेकदा मार्गच माहिती नसल्याने त्याच त्याच विषयांकडे विद्यार्थ्यांचा ओढा राहतो. त्यामुळे वैद्यकीय-अभियांत्रिकीबरोबरच विद्यार्थ्यांना ‘विज्ञान शाखेतील करिअर ‘विज्ञाना’ची माहिती करून देण्याकरिता ‘लोकसत्ता’ने ‘मार्ग यशाचा’ या करिअरविषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
ठाणे व मुंबईतील यशानंतर हा कार्यक्रम वाशीतील विष्णुदास भावे नाटय़गृहात येत्या ३ व ४ जून रोजी पार पडणार आहे. या कार्यक्रमात नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, समुपदेशक विवेक वेलणकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. याचसोबत कार्यक्रमात पुढील वर्षी वैद्यकीय व दंत वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘नीट’ या पात्रता परीक्षेबाबतही माहिती दिली जाईल. या ‘नीट’ परीक्षेत नेमके काय दडले आहे याबाबत एस. के. सोमय्या महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विषयाचे विभागप्रमुख प्रा. नागेश सावंत विशेष मार्गदर्शन करतील.
वाशीत शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यक्रमात सलग दोन दिवस तज्ज्ञांकडून करिअरविषयक नवनव्या संधींविषयी माहिती करून देण्यात येणार आहे. ‘विष्णुदास भावे’ नाटय़गृहात रंगणाऱ्या या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाचा शुभारंभ सकाळी ९.३० वाजता मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्राचे उद्घाटन सकाळी ९.३० वाजता नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे करणार आहेत. या दोन दिवसीय कार्यक्रमांच्या दोन्ही सत्रांत सिक्रेट ऑफ ‘नीट’ या सध्याच्या महत्त्वपूर्ण विषयावर एस. के. सोमैय्या महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विषयाचे विभागप्रमुख प्रा. नागेश सावंत विशेष मार्गदर्शन करणार आहेत.

प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण
‘अ‍ॅमिटी युनिव्‍‌र्हसिटी’ने प्रेझेंट केलेल्या व ‘विद्यालंकार क्लासेस’च्या सहकार्याने होत असलेल्या या कार्यक्रमाला पॉवर्डबाय म्हणून ‘आयईईआयटी डिझाइन स्टुडिओ’, ‘दिलकॅप महाविद्यालय’, ‘रोबोमेट’, ‘एलटीए’ आणि ‘सास्मिरा’ आहेत. या कार्यक्रमाला नवी मुंबई पालिकेचे विशेष सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका रविवार, २९ मेपासून विष्णुदास भावे नाटय़गृह, वाशी आणि विद्यालंकार क्लासेस, शिव पार्वती शॉपिंग कॉम्पलेक्स, नेरूळ रेल्वे स्थानकासमोर, सेक्टर २१, नेरूळ (पू.) येथे मिळतील. त्या http://in.bookmyshow.com/mumbai या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- ६७४४०३४७ किंवा ६७४४०३६९

विषय आणि वक्ते
* कला क्षेत्रातील वळणवाटा – दिपाली दिवेकर, करिअर समुपदेशक, आयव्हीजीएस
* वाणिज्यमधील करिअर व्यवहार – अमीर अन्सारी, करिअर समुपदेशक
* ललित कलांतील ‘संधी’राग’ – जयवंत कुलकर्णी, करिअर समुपदेशक, आयव्हीजीएस
* विज्ञान शाखेतील करिअर ‘विज्ञान’ – विवेक वेलणकर, करिअर समुपदेशक