मुंबईत १९ व २० मे रोजी कार्यशाळा; अश्विनी जोशी यांच्या हस्ते उद्घाटन

दहावी-बारावीनंतरच नव्हे तर पदवीनंतर काय याचे खात्रीशीर आणि समाधानकारक उत्तर करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावरच मिळावे यासाठी ‘लोकसत्ता’ आयोजित ‘मार्ग यशाचा’ या कार्यशाळेचे उद्घाटन ठाण्याची कारकीर्द यशस्वीपणे गाजविलेल्या आणि सध्या मुंबईच्या (शहर) जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सनदी अधिकारी अश्विनी जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. १९ आणि २० मे रोजी प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिर येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखांची मळलेली वाट चोखाळायची की कुणीतरी सुचविले म्हणून व्यावसायिक पदवी, पदविका अभ्यासक्रमांच्या वाटय़ाला जायचे, हा प्रश्न करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात असतो. अशा विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध टप्प्यांवरील पर्यायांची माहिती ‘मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत करून देण्यात येईल. यात दहावी-बारावीच्या आणि पदवीच्या विद्यार्थ्यांना कला, विज्ञान, वाणिज्य, ललित कला या विद्या शाखांमधील विविध अभ्यासक्रमांची माहिती त्या क्षेत्रातील तज्ज्ञ करिअर समुपदेशक करून देतील. या विषयांतील विविध अभ्यासक्रम, त्यांच्या प्रवेश परीक्षा, त्यात असलेल्या उच्च शिक्षणाच्या संधी, त्यातून खुले होणारे करिअरचे विविध मार्ग अशा विविध पातळ्यांवर ‘व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था’ (आयव्हीजीएस) या राज्य सरकारच्या जुन्या व नामांकित संस्थेचे अनुभवी व तज्ज्ञ समुपदेश विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक सत्रात विद्यार्थ्यांना तज्ज्ञांना प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेता येईल. १९ आणि २० मे या दोन दिवशी होणाऱ्या कार्यशाळेत दोन्ही दिवशी एकच वक्ते असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी-पालकांना आपल्या सोयीनुसार या कार्यशाळेत सहभागी होता येईल.

प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण

अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीने प्रेझेंट केलेल्या व विद्यालंकार क्लासेसच्या सहकार्याने होत असलेल्या आणि सपोर्टेड बाय युक्ती तसेच पॉवर्ड बाय गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन, अरेना अ‍ॅनिमेशन एन. ए. एम. एस. शिप मॅनेजमेंट प्रा. लि. आणि सास्मिरा आदींच्या विद्यमाने होत असलेल्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’चे ‘नॉलेज पार्टनर’ ‘आयटीएम’ हे आहेत. कार्यक्रमाची प्रवेशिका रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी आणि विद्यालंकार क्लासेस, हिंदू कॉलनी येथे तसेच शनिवार आणि रविवारवगळता ‘लोकसत्ता’च्या नरिमन पॉइंट येथील कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मिळतील. ५० रुपये इतके प्रवेशिकेचे शुल्क आहे. तसेच ्रल्ल.ु‘े८२ँ६.ूे या संकेतस्थळावरही ही तिकिटे उपलब्ध आहेत.

विषय आणि वक्ते

  • क-कलचाचणीचा आणि करिअरचाही

दीपाली दिवेकर, करिअर समुपदेशक, आयव्हीजीएस (विषयांची निवड कशी करावी, आपला कल नेमका कुठल्या विषयाकडे आहे हे कसे ओळखावे, आपले व्यक्तिमत्त्व त्याकरिता कसे घडवावे याविषयी मार्गदर्शन )

  • कला क्षेत्रातील वळणवाटा

नीता खोत, करिअर समुपदेशक, आयव्हीजीएस (कला शाखेतील विषय आणि त्यातील करिअरच्या संधींविषयी माहिती)

  • वाणिज्यमधील करिअर व्यवहार

सुरेश जंगले, करिअर समुपदेशक, आयव्हीजीएस (वाणिज्य शाखेतील विषय आणि त्यात उपलब्ध असलेल्या करिअर संधी)

  • ललित कलांतील संधीराग

जयवंत कुलकर्णी, करिअर समुपदेशक, आयव्हीजीएस (अंगभूत कलेतून करिअरचा मार्ग कसा शोधायचा याविषयी दिशादर्शन)

  • विज्ञान शाखेतील करिअर विज्ञान

विवेक वेलणकर, करिअर समुपदेशक, (विज्ञान शाखेत उपलब्ध असलेल्या करिअर संधी)