ऑक्टोबर १९९६ मध्ये घरगुती उद्योगातून रुजलेला ‘अहिल्या महिला मंडळा’चा वेलू आज मुक्ताई विद्यामंदिर, वृद्धाश्रम, आरोग्य केंद्र, रक्तसाठा केंद्र, वाचनालय, पोळीभाजी केंद्र, कौटुंबिक सल्ला केंद्र, ज्येष्ठ महिलांसाठी एक दिवसाचे माहेर, इंदिरा संस्कृत पाठशाळा, आदिवासी मुलींसाठी वसतिगृह.. असे टप्पे ओलांडत गगनावरी जाऊन पोहोचलाय. पावलोपावली परीक्षा पाहणारा हा काळ, पण वासंती देव नावाचा आधारवड पाठीशी होता.. आहे म्हणूनच आज पेणच्या पंचक्रोशीत ‘अहिल्या महिला मंडळा’चे नाव आदराने घेतले जातय. वासंती देव या आजच्या पहिल्या नवदुर्गेला आमचा मानाचा दंडवत!

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
How Sudha Murthy cope with menopause
“एकदिवस अचानक मला मुलांची आठवण आली अन् रडू आले”; सुधा मूर्ती यांनी सांगितला मेनोपॉजदरम्यान अनुभवलेला प्रसंग
savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..

‘‘पेण शहरापासून दहा-बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या हेटवणे-वाघूळ या गावांमधील आदिवासी पाडय़ांतील मुलांसाठी शाळा सुरू करण्याच्या संदर्भात आमच्या मंडळाला शासनाकडून विचारणा झाल्यावरच खरे तर आम्ही तिथे प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला; परंतु गावातील एका गटाला ते मान्य नव्हते. त्यांनी शाळा बंद पाडण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. रात्री-अपरात्री निनावी दूरध्वनी येत. त्यात कधी थेट धमकी असे तर कधी अश्लील शब्दांत नको ते आरोप केले जात. पण आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहिलो.. त्यांना स्पष्ट सुनावलं की, तुम्हाला शाळेची जागा रिकामी करून हवी असेल तर घ्या, आम्ही मुलांना झाडाखाली शिकवू, पण आता माघार नाही. तो ठामपणे घेतलेला निर्णय काम करून गेला.

आज पाडय़ावरच्या शाळेचे वर्ग चौथीपर्यंत वाढलेत. मुलांची संख्याही २७० वर गेलीय. वीस टक्के अनुदान मिळून शाळा डिजिटलही झालीय. १९९७ च्या जूनपासून २०१७ च्या जूनपर्यंतच्या प्रवासात असे अनेक अनुभव येत गेले. आम्हाला परिपक्व करीत गेले.’’  अहिल्या महिला मंडळाच्या संस्थापिका वासंती देव, मुक्ताई विद्यामंदिर या आपल्या अनेक कामांपैकी एका आयामाचा वीस वर्षांचा प्रवास उलगडत होत्या. वासंती देव यांचे काम फक्त या आदिवासी मुलांच्या शिक्षणापुरते मर्यादित नाही तर येथील स्त्रियांसाठीही ते ठामपणे उभे राहिले आहे. ऑक्टोबर १९९६ मध्ये पापड-लोणची, मसाले, दिवाळी फराळ.. अशा घरगुती उद्योगातून रुजलेला ‘अहिल्या महिला मंडळा’चा वेलू आज मुक्ताई विद्यामंदिर, पोळीभाजी केंद्र, वृद्धाश्रम, आरोग्य केंद्र, रक्तसाठा केंद्र, वाचनालय, संस्कार वर्ग, कौटुंबिक सल्ला केंद्र, ज्येष्ठ महिलांसाठी एक दिवसाचे माहेर, इंदिरा संस्कृत पाठशाळा, आदिवासी मुलींसाठी वसतिगृह.. असे टप्पे ओलांडत गगनावरी जाऊन पोहोचलाय. अहिल्या मंडळाने जेव्हा वृद्धाश्रम सुरू केला तो १५ वर्षांपूर्वीचा काळ या संकल्पनेच्या विरोधातच होता. त्यामुळे पेणसारख्या छोटय़ा शहरात हे शिवधनुष्य उचलणे महाकठीण होते. डॉ. घाटे यांची जागा संस्थेला वापरायला मिळाली, एवढीच जमेची बाजू.  २५ जून २००३ ला ‘संजीवन’ हा पहिला वृद्धाश्रम उभा राहिला आणि नंतर त्याची गरज इतकी वाढली की  एप्रिल २०१७ पासून त्यांनी दुसरा ‘स्नेहांगण’ नावाने वृद्धाश्रम सुरू केला. आज ४६ वृद्ध येथे मजेत राहत आहेत. त्यातील काहींना तर मोफत सांभाळले जातेय. पुढे या वृद्धाश्रमात वासंतीताईंचे शतायू वडील स्वातंत्र्यसैनिक व संस्कृतचे गाढे अभ्यासक तात्या कर्वे येथे राहायला आले. त्यांनी १ जुलै (२००३) पासून वासंतीताईंच्या सल्ल्याने या वृद्धाश्रमात इंदिरा संस्कृत पाठशाळा हा उपक्रम सुरू केला. याअंतर्गत आजपर्यंत चार हजारांवर मुलांनी इथे संस्कृत शिक्षण घेतलेय. १२ महिला पौरोहित्य शिकून व्यावसायिक बनल्या आहेत. अनेकींच्या नावापुढे संस्कृत घेऊन बी.ए. एम.ए. अशा पदव्या विराजमान झाल्यात. यातील काही जणींनी आता पाठशाळेची धुरा आपल्या खांद्यावर घेतलीय.

पेण तालुक्यातील डोंगराळ भागात कातनुरी समाजाच्या ७० ते ८० वाडय़ा आहेत. वर्षांतले सात-आठ महिने वीटभट्टय़ांवर वा इमारतींच्या बांधकामावर मजूर म्हणून राबवणाऱ्या या समाजात मुलींचे शिक्षण ती अशक्यप्राय गोष्ट. त्यातच त्यांची अल्पवयात लग्ने लावून दिली जात. यावर तोडगा काढण्यासाठी १२ मुलींसह १५ जून २००८ ला ‘आनंदी’ वसतिगृहाची स्थापना झाली. सुरुवातीला या मुलींना बंधनात राहायला आवडत नसे. काही जणींनी रात्री खिडक्यांतून उडय़ा टाकून पळून जाण्याचाही प्रयत्न केला. त्यांना समजावून परत आणणे, शिस्त लावणे, त्यांच्या पालकांशी संवाद ठेवणे अशा अनेक गोष्टी कराव्या लागल्या. वसतिगृहाच्या निधीचा प्रश्नही चार वर्षांच्या धडपडीनंतर दत्तक पालक योजनेद्वारा मार्गी लागला. आज या वसतिगृहात पंचवीस मुली राहत असून पाच जणी पदवीधर होऊन आपल्या पायांवर उभ्या आहेत. त्यातील एकीने तर जोडीदारासह वनवासी कल्याणाश्रमाच्या कामाला वाहून घेतलेय.

मंडळाच्या ‘स्वयंसिद्धा’ या उपक्रमाद्वारे आजवर ५००० गरजू स्त्रियांनी शिवणकलेच्या माध्यमातून आपल्या संसाराचा तोल सावरलाय, तर संस्थेच्या कौटुंबिक सल्ला केंद्राच्या प्रयत्नांमुळे ५० संसार पुन्हा नव्याने नांदू लागले आहेत. मंडळाचे काम बोलू लागल्यावर मदतीचा ओघ वाढू लागला. ज्यायोगे ऑक्टोबर २००७ मध्ये पेणच्या मध्यवर्ती भागात संस्थेची स्वत:ची तीन मजली वास्तू उभी राहिली आणि सर्व उपक्रम एका छपराखाली आले.

या अहिल्यांची धडाडी पाहून महाडच्या जनकल्याण रक्तपेढीने रक्तसाठा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. परिणामी ‘कृष्णाजी रानडे ब्लड बँक’ सुरू झाली. ज्यायोगे पेणमधील रुग्णांना दर वर्षी ४०० ते ५०० पिशव्या रक्त विनासायास मिळू लागले. ज्येष्ठ महिलांसाठी एक दिवसाचे माहेरपण ही वासंतीताईंची आगळीवेगळी संकल्पना. २००३ पासून दर ३१ डिसेंबरला कष्टकरी महिलांपासून उच्चशिक्षितांपर्यंत २०० ते ५०० जणी एक दिवसाचे माहेरपण यथेच्छ अनुभवतात.

कुटुंबीयांचे सहकार्य आणि इच्छाशक्ती याच्या जोरावर ५० कार्यकर्त्यांचे मोहळ उभारून विविध उपक्रमांद्वारे अनेक स्त्रियांना रोजगाराची संधी देणाऱ्या वासंतीताईंना पेणच्या रोटरी क्लब, इनरव्हिल क्लब, सन्मित्र मंडळ यांनी गौरवलेय. मंडळाला मिळालेल्या पुरस्कारांची तर गणतीच नाही. सत्तरीच्या उंबरठय़ावर पोहोचूनही अथकपणे काम करणाऱ्या या नवदुर्गेला मानाचा दंडवत!

संपदा वागळे

waglesampada@gmailcom