‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ स्पर्धेची महाअंतिम फेरी १७ फेब्रुवारी रोजी मुंबईत होणार आहे. या महाअंतिम फेरीसाठी ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी हे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून ते ‘प्रशासन आणि जनता’ या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत.  ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, ‘विश्वेश्वर सहकारी बँक लि.-पुणे’, एमआयटी-औरंगाबाद, ‘इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट’ (आयसीडी-औरंगाबाद) ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी धर्माधिकारी यांनी ‘चाणक्य मंडळ’ ही संस्था स्थापन केली आहे. स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करण्याचे काम गेली अनेक वर्षे ‘चाणक्य मंडळ’तर्फे केले जात आहे. ‘अस्वस्थ दशकाची डायरी’, ‘नवा विजयपथ’, ‘स्वतंत्र नागरिक’, ‘१० वी, १२ वी नंतरचे करिअर आणि व्यक्तिमत्त्व विकास’, ‘आधुनिक भारताचा इतिहास’ (ऑडिओ बुक), ‘आणि आपण सगळेच’, ‘िजकणारा समाज घडविण्यासाठी’ आदी पुस्तकांचे लेखक तसेच अभ्यासू वक्ते, विचारवंत म्हणूनही धर्माधिकारी यांची ओळख आहे.