‘लोकसत्ता’ माध्यम प्रायोजक; उद्या यशवंतराव चव्हाण केंद्रात कार्यक्रम

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या साहित्याचे दर्शन घडविणारा आगळावेगळा कार्यक्रम २३ ऑगस्टला मुंबईत आयोजिण्यात आला आहे.

‘पॉप्युलर प्रकाशन’तर्फे होणाऱ्या या कार्यक्रमाचा ‘लोकसत्ता’ माध्यम प्रायोजक आहे. ‘यशवंतराव चव्हाण सेंटर’चेही सहकार्य या कार्यक्रमाला लाभले आहे. ‘एटू लोकांचा देश’ खरेतर विंदांनी आपल्या मुलाकरिता म्हणजे उदय करंदीकर यांच्याकरिता लिहिले होते. परंतु, पुढे प्रकाशनानंतर या ‘देशा’ने मराठी साहित्य, खासकरून बालकांचे विश्वच काबीज केले. अजूनही या पुस्तकाचे गारूड कायम आहे. अशा या पुस्तकाच्या निर्मितीमागील कथा उदय करंदीकर या वेळी उलगडणार आहेत. याचबरोबर ‘विंदां’चे द्वितीय चिरंजीव आनंद करंदीकर आणि कन्या जया काळे विंदांच्या कवितांचे सादरीकरण करणार आहेत. मुलांच्या नजरेतून विंदांच्या साहित्याचा प्रवास अनुभवल्यानंतर साहित्य क्षेत्रातील मान्यवरांकडून रसिकांना विंदांच्या साहित्याचे दर्शन घडविले जाईल.

ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्रा विंदांच्या ललित साहित्यावर या वेळी बोलणार आहेत, तर कवी सौमित्र म्हणजेच किशोर कदम लघुनिबंधातून विंदांच्या काव्याचे आणि साहित्याचे दर्शन घडवतील. विंदांच्या आवाजातील ध्वनिफीत या वेळी ऐकविली जाणार असून साहित्य रसिकांकरिता ही आगळीवेगळी मेजवानी ठरेल.

पॉप्युलरचे रामदास भटकळ देखील या वेळी विंदांसोबतच्या मैत्रीचा पट उलगडणार आहेत. यशवंतराव चव्हाण केंद्रात बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होईल. या वेळी समग्र विंदा (१००० हजार रुपये) आणि विंदा करंदीकर बालकविता संच (११०० रुपये) विशेष सवलतीत वाचकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.