वाकोला नाला परिसरातील खारफुटीच्या जमिनीवर बेकायदेशीररीत्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार नाही, अशी हमी देण्याचे स्पष्ट करीत पालिका, एमएमआरडीए आणि उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी परिसरात कुठे बेकायदा कचरा फेकला जातो याचा अहवाल १ ऑक्टोबपर्यंत सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले.
वाकोला नाला परिसरातील खारफुटीच्या जमिनीवर सर्रासपणे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत असल्याचा आरोप करणारी जनहित याचिका जगदीश गांधी यांनी केली असून न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. एम. एस. सोनाक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. गांधी यांनी कचऱ्याची बेकायदा विल्हेवाट लावण्यात येत असल्याची छायाचित्रेही न्यायालयात सादर केली. त्यावर पर्यावरणीयदृष्टय़ा किनारपट्टीच्या परिसरातील खारफुटी महत्त्वाची असून पालिका, एमएमआरडीए यांनी तिचा ऱ्हास होण्यापासून बचाव करण्याची गरज असल्याचे न्यायालयाने म्हटले.