News Flash

भाषणाचे तंत्र आणि मंत्र

कला वक्तृत्वाची माधव गडकरी

कला वक्तृत्वाची माधव गडकरी

भाषण आणि व्याख्यान असे दोन शब्द आपण नेहमी वापरतो. ‘स्पीच’ आणि ‘लेक्चर’ या इंग्रजी शब्दांचे हे प्रतिशब्द आहेत. एखाद्या मोठय़ा समारंभात थोडा वेळ केले जाते ते भाषण. अशा समारंभात आणखीही काही वक्ते असतात व त्यांचीही भाषणे होतात. परंतु एकाच व्यक्तीचे आधी ठरविलेल्या विषयावर होते ते व्याख्यान. व्याख्यान हे त्या विषयावरचे असते. ते अभ्यासपूर्ण असावे अशी अपेक्षा असते. विषयाची मांडणी त्यात नीटपणे करावी लागते व तो शेवटही परिणामकारक व्हावा लागतो. भाषणात अभ्यास व मांडणी ही मर्यादेत नीट लागतेच, परंतु ते परिणामकारक करण्यावर अधिक भर असतो.

भाषणाची अगर व्याख्यानाची सुरुवात ही नेहमी चांगल्या तऱ्हेने व्हावयास लागते. सुरुवात चांगली झाली तर जसा क्रिकेट सामना जिंकता येतो तसे भाषणाचे आहे. भाषणाची सुरुवात आणि व्याख्यानाची सुरुवात ही दोन वेगळ्या पद्धतीमध्ये होते. व्यासपीठावर बसलेल्या व ज्यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे त्यांची नावे वक्त्याने नेहमीच नीट समजून घ्यावयास हवीत. भाषणाच्या सुरुवातीलाच वक्त्याची दांडी येथे उडते. भाषणाला वक्ता जेव्हा उभा राहतो तेव्हा पहिली दोन मिनिटेच महत्त्वाची असतात. समोरचे श्रोते पाहून चांगले वक्ते थोडे बावचळतात. आपण सुरुवातीला कुणाकुणाची नावे घेणार हे न ठरविता जे वक्ते उभे राहतात ते तर साफ गोंधळून जातात. माणसाच्या मेंदूची रचना मोठी अजब आहे. जेव्हा कसलेही दडपण मनावर नसते तेव्हा त्या मेंदूत अनेक वर्षांपूर्वी साठविलेल्या घटना काल घडल्यासारख्या आयत्यावेळी आठवू लागतात आणि वक्ता गडबडला तर समोर बसलेल्या अध्यक्षांचे माहीत असलेले नाव काही जिभेवर येत नाही.

भाषणाची सुरुवात नामावलीने केल्यानंतर सर्वप्रथम कोणता मुद्दा आपण मांडणार, काय बोलणार हे वक्त्याने नेहमीच ठरविले पाहिजे. भाषणास उभे राहिल्यानंतर ज्यांची नावे घ्यायची ती नीट घेतल्यानंतर पहिली गोष्ट कोणती करायची असेल तर ती सभा ताब्यात घ्यायची असते. श्रोत्यांना जिंकायचे असते. जो वक्ता पहिल्या पाच मिनिटांत सभा ताब्यात घेतो तो अर्धी लढाई जिंकतो. भाषण संपू नये असे श्रोत्यांना वाटत असतानाच आपण ते भाषण संपवू शकतो व मग टाळ्यांचा गजर होतो. व्याख्यानाची सुरुवात शाब्दिक चाळे करून करता येते. परंतु ते चाळे संबंधित विषयाबद्दलचे असावे लागतात. ते फालतू असून तर कधीच व कुठेच चालत नाहीत. आणि त्याचाही उपयोग श्रोत्यांना ताब्यात घेण्यापुरताच करावयाचा असतो.

आचार्य अत्रे यांनी आपल्या विनोदी व्याख्यानांनी महाराष्ट्र डोक्यावर घेतला. त्यांच्यासारख्या बलदंड वक्त्यानेही भाषणाची सुरुवात नीटपणे झाली पाहिजे याचा परिपूर्ण विचार केला होता. व्याख्यानाची सुरुवात जशी उत्तम तऱ्हेने करावयास हवी तसा त्याचा शेवटही चांगला करता आला पाहिजे. विषय ठाशीवपणे मांडल्यानंतर भाषण संपविताना दोन-तीन गोष्टी करता येतात. व्याखानाचा शेवट करताना आपल्या प्रतिपाद्य विषयाचे निष्कर्ष मांडणे अत्यावश्यक असते व भाषण कसे समेवर येऊन संपायला लागते. यशस्वी वक्तृत्वाची खरी कसोटी भाषणाचा शेवट करताना लागते. अनेक चांगले वक्ते  या शेवटच्या शेपटावर पाय घसरून पडतात. यासाठी सुरुवात जशी मनात अगर टिपणात योजून ठेवायची तसा शेवटही योजून ठेवावा लागतो. त्यात भाषणाचा शेवट करणे सोपे असते. परंतु प्रदीर्घ व्याख्यानाचा समारोप करणे फार अवघड असते.

भाषणाची अगर व्याख्यानाची सुरुवात अगर शेवट कसा करायचा हा तंत्राचा भाग झाला. परंतु त्या भाषणाचा  गाभा खरा महत्त्वाचा. तो खरा मंत्र. तो मंत्र हाती येण्यासाठी वाचन, चिंतन, स्वानुभव याची जोड असायला पाहिजे.

untitled-20

संकलन- शेखर जोशी

(माधव गडकरी लिखित आणि रोहन प्रकाशन प्रकाशित सभेत कसे बोलावेया पुस्तकावरून साभार)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 12:25 am

Web Title: madhav gadkari oratorical skills
Next Stories
1 मुख्यमंत्री तोंडघशी; केंद्राच्या अहवालात मुंबई महापालिकेचा कारभार सर्वाधिक पारदर्शी
2 ‘लोकसत्ता’च्या उद्याच्या अंकात अर्थतज्ज्ञांची मांदियाळी
3 मुद्रांक-नोंदणी शुल्काच्या उत्पन्नात ३० टक्क्यांची घट
Just Now!
X