मराठवाडय़ातील टंचाई परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारपासून तीन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यामध्ये पाच जिल्ह्य़ांमधील पीक परिस्थिती, चारा छावण्या, जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांना भेटी देण्यासह शासकीय यंत्रणेकडून सुरु असलेल्या मदतीच्या उपाययोजनांची ते माहिती घेणार आहेत.  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री लगेच मराठवाडय़ाकडे रवाना होणार आहेत. लातूर जिल्ह्य़ाची आढावा बैठक दुपारी घेतल्यावर शिरूर अनंतपाळ, निलंगा व औसा तालुक्यातील गावांना भेटी दऊन ते पीक परिस्थिती व चारा छावण्यांची पाहणी करतील. मुख्यमंत्री फडणवीस रात्री उस्मानाबाद येथे आढावा बैठक घेतील. ते बुधवारी उस्मानाबाद जिल्ह्य़ातील भूम आणि परांडा तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करतील. त्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्री परभणी जिल्ह्य़ातील काही गावांमध्ये जाऊन जलयुक्त शिवारची कामे, चारा छावण्या आदींची पाहणी करणार आहेत.