समृद्धी महामार्ग हा २० हजार कोटींचा हायवे आहे. त्याचा भार बजेटवर पडणार नाही. उलट समृद्धी महामार्गामुळे जीडीपीमध्ये मोठी वाढ होईल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते एबीपी माझा वृत्तवाहिनीवरील ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या कार्यक्रमात बोलत होते. नवी मुंबईतील जेएनपीटी बंदर देशातील ७० टक्के कंटेनर ट्रॅफिक संभाळते. पण या बंदराचा फायदा मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, आणि काही प्रमाणात औरंगाबादला झालाय. त्यापलीकडे राज्याला फारसा फायदा झाला नाही.

८० समृद्धी महामार्ग हा मागास भागातून जातो. त्यामुळे निश्चित त्याचा अर्थव्यवस्थेला फायदा होईल असे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात औद्योगिकीकरणामध्ये देशात आघाडीवर आहे. पण या महामार्गामुळे आणखी औद्योगिकरणाला चालना मिळेल असे फडणवीस यांनी सांगितले.

या कार्यक्रमात त्यांना बुलेट ट्रेन संदर्भात प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी बुलेट ट्रेनला होणारा विरोधही खोडून काढला. जेव्हा देशात एअरपोर्ट बांधण्याचा निर्णय झाला तेव्हा देशात एक टक्के लोकही विमान प्रवास करत नव्हते. पण पंधरा हजार कोटी रुपये खर्चून एअरपोर्ट बांधण्यात आले. त्यामुळे हवाई मार्गाने आपण जोडले गेलो. रोजगाराच्या संधी वाढल्या. तेच बुलेट ट्रेनच्या बाबतीत आहे.

बुलेट ट्रेनसाठी १ लाख कोटीची गुंतवणूक जपान करणार आहे. त्यासाठी जपान ५० वर्षांसाठी कर्ज देणार आहे. महत्वाच म्हणजे या करारात तंत्रज्ञान हस्तांतरण आहे. बुलेट ट्रेन बांधणीसाठी सिमेंट, लोखंडाची गरज लागणार. रेल्वे कोचेस बनवले जाणार त्यामुळे कितीतरी मोठया प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनमुळे आर्थिक विकासच होईल असा दावा त्यांनी केला. चीनचा विकासही बुलेट ट्रेन आल्यानंतरच झाला. बुलेट ट्रेन येण्याआधी चीनचा जीडीपी भारतापेक्षा कमी होता असे फडणवीस यांनी सांगितले.

देशात रोजगारासाठी गुंतवणूक करायची असेल तर आपल्याला बँकांमार्फत निधीची व्यवस्था करावी लागते पण बुलेट ट्रेनमुळे सहज भांडवल उपलब्ध होतेय असे ते म्हणाले. बुलेट ट्रेनसाठी मुंबई-अहमदाबाद मार्गाची निवड का केली ? असा प्रश्न विरोधक विचारतात त्यावर फडणवीस म्हणाले कि, बुलेट ट्रेनचा हा मार्ग आधीच्या मनमोहन सिंग सरकारच्या काळात निश्चित झाला होता असे सांगितले.