मुंबई : राज्यातील २६० महाविद्यालयांना अखेर पूर्णवेळ प्राचार्य मिळणार असून शासनाने प्राचार्याची भरती करण्यास मंजुरी दिली आहे.

राज्यातील प्राध्यापक आणि प्रचार्याची पदे रिक्त आहेत. प्राचार्याची शेकडो पदे रिक्त आहेत. त्यापैकी काही पदे भरण्यासाठी शासनाने परवानगी दिली होती. मात्र करोना संसर्गानंतर वित्त विभागाने ४ मे रोजी राज्यातील पद भरतीवर निर्बंध आणले. मात्र, प्राचार्य नसल्यामुळे महाविद्यालयांच्या रोजच्या कामकाजावर परिणाम होत होता. अनेक महाविद्यालयांचे नॅकचे मूल्यांकनही रखडले होते.

विविध संघटनांनी प्राचार्याची पदे भरण्याची मागणी केली होती. अखेर शासनाने प्राचार्याची २६० पदे भरण्यास वित्त विभागाने ४ मेच्या निर्बंधातून सूट दिली आहे. त्यामुळे या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.