एकदा दिलेली संमती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रद्दबातल होत नसल्यामुळे नोंदणीकृत करारनामा मिळाल्याशिवाय संमती देण्यास मध्य मुंबईतील चाळवासीयांनी नकार दिल्यामुळे बडय़ा बिल्डरांनाही चपराक बसली आहे. मध्य मुंबईत अनेक चाळींचा पुनर्विकास वर्षांनुवर्षे रखडल्याचे पाहूनच रहिवाशांमध्ये ही जागरूकता आल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी चाळ कमिटी दबाव आणत असली तरी चाळवासीय मात्र आपल्या मतावर ठाम असल्याचे दिसून येत आहे.
जुन्या चाळींच्या पुनर्विकासासाठी ७० टक् के संमतीपत्रे आवश्यक असतात. चाळ कमिटीतील काही सदस्यांना हाताशी धरून चाळमालक तसेच त्यांनी नेमलेला विकासक चाळवासीयांमध्ये गटाचे राजकारण करून अधिकाधिक संमती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र चाळवासीय नोंदणीकृत करारनाम्यासाठी आग्रह धरत असताना नोटरीकृत करारनामाही चालतो, असे त्यांना बिंबवले जात आहेत. परंतु चाळवासीयांनी संमती देण्यापूर्वी नोंदणीकृत करारनामा करून घ्यावा, असे मुंबई इमारत व दुरुस्ती पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मोहन ठोंबरे यांनीच स्पष्ट केल्यामुळे चाळवासीयांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. सध्या मध्य मुंबईतील रंगारी बदक चाळींचा पुनर्विकास करण्यासाठी ‘गोल्ड प्लाझा’ हा विकासक पुढे आला आहे. रहिवाशांना दिलेल्या लेखी पत्रात सुरुवातीला या विकासकाने नोंदणीकृत करारनामा देण्याचे मान्य केले होते. आता मात्र नोटरीकृत करारनामा देऊ, असे तो सांगत असून चाळवासीयांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. मात्र काही चाळवासीयांनी नोंदणीकृत करारनाम्यासाठीच आग्रह धरल्यामुळे विकासकाला पुनर्विकासाचे घोडे पुढे दामटता आलेले नाही. यासाठी प्रसंगी विरोध करणाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत.
शेजारी असलेल्या भिवंडीवाला चाळीतही पुनर्विकासासाठी बिल्डर जवळजवळ निश्चित झाला होता. परंतु चाळवासीयांनी पुढाकार घेऊन सध्या पुनर्विकासात सामील व्हायचे नाही, असे ठरविले आहे. नूरबानो चाळीतील रहिवाशांनीही पुनर्विकासासाठी विकासकांकडून प्रस्ताव मागविण्यास सुरुवात केली आहे. परंतु इतर चाळवासीयांची झालेली दुरवस्था नजरेसमोर ठेवूनच पुनर्विकास प्रकल्प राबविण्याचा निर्धार या चाळवासीयांनी व्यक्त केला
आहे.
रखडलेल्या चाळी
*गुल्लू खोजा बिल्डिंग, चिंचपोकळी – सहा वर्षांपासून रहिवासी हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत. भूखंड मोकळा करण्यात आला आहे.
*मेस्त्री बिल्डिंग, चिंचपोकळी – डी. बी. रिअ‍ॅलिटीकडे प्रकल्प, आठ वर्षांपासून प्रतीक्षा.
*पानवाला बिल्डिंग, परळ – रहिवासी अडीच वर्षांपासून अन्यत्र भाडय़ाने. अद्याप फारशी प्रगती नाही.
*दळवी बिल्डिंग, परळ – सुरुवातीला तीन वर्षे अन्य बिल्डर. आता नवा बिल्डर असला तरी गेल्या तीन वर्षांपासून परिस्थिती ‘जैसे थे’. रहिवासी भाडय़ाने अन्यत्र.
*श्रीमोतांका (पूर्वीच्या श्रीकृष्ण, मोटावाला, तांबावाला आणि काशिनाथ चाळ), चिंचपोकळी – तीन वर्षांपासून रहिवासी घराच्या प्रतीक्षेत.
*डॉक्टर कंपाऊड – पुनर्वसनाची इमारत तयार. मात्र बिल्डरने कमी क्षेत्रफळ दिल्यावरून वाद. रहिवाशांचा नव्या इमारतीत जाण्यास नकार.