पित्ताशयात खडे झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मंगळवारी रात्रीच शरद पवारांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून पित्ताशयाचा खडा शस्त्रक्रिया करुन काढला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. शरद पवारांना होणाऱ्या वेदना थांबल्या सध्या त्यांची प्रकृती चांगली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

“शरद पवारांना चार ते पाच दिवसांनी डिस्चार्ज मिळू शकेल. त्यांच्यावर पुन्हा एक सर्जरी करावी लागणार असून त्यासाठी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावं लागणार आहे. ही शस्त्रक्रिया लगेच किंवा १० दिवसांनी केली जाऊ शकते असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. पवारांची प्रकृती लवकर स्थिर झाल्यास ती लवकरही केली जाऊ शकते. डॉक्टरांनी १० दिवसांनी सर्जरी करणं योग्य ठरेल असं सुचवलं आहे,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

शरद पवारांनी शस्त्रक्रियेनंतर स्वत:ला गुंतवून घेतलं आवडत्या कामात; लेकीनेच ट्विट केला फोटो

दरम्यान शस्त्रक्रिया झाल्यानंतर पवारांचा पहिला फोटो त्यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. सुप्रिया यांनी केलेल्या या पोस्टमध्ये शरद पवार वृत्तपत्र वाचताना दिसत आहेत. “सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय शरद पवार साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत,” असं या फोटोला कॅप्शन देताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

सोमवारी पहिल्यांदाच शरद पवार यांना गॉल ब्लँडरचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी पवारांना बुधवारी रुग्णालयात दाखल करुन शस्त्रक्रिया करण्याचं ठरवण्यात आलेलं. मात्र अधिक त्रास जाणवू लागल्याने मंगळवारी रात्री उशीरा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

पवारांना हा त्रास जाणवू लागल्याने त्यांचे सर्व नियोजित राजकीय दौरे रद्द करण्यात आल्याची माहिती आधीच देण्यात आली होती. पाच राज्यामधील निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पवार पश्चिम बंगालसहीत इतर राज्यांमध्ये निवडणुक प्रचार दौरा करणार होते.