मुंबई, ठाण्यातच नव्हे तर कुठेही डान्स बार सुरू असता कामा नये, असे आदेशच राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले आहेत. तरीही त्याची नीट अंमलबजावणी होत नसल्याचे पाहून  गृहमंत्रालयानेच आता कारवाईसाठी पुढाकार घेतला आहे.
ठाण्यात गुरुवारी मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने केलेल्या कारवाईमुळे ही बाब अधोरेखित झाली आहे. त्याआधी गृहमंत्रालयाकडून नवी मुंबई तसेच ठाण्यातील डान्स बारवर ठाणे ग्रामीण तसेच मुंबई पोलिसांमार्फत छापे टाकले गेले.
ठाण्यातील डायघर रोडवरील एसएक्स-फोर या बीअर बार आणि गेस्ट हाऊसवरील छाप्याबाबत गृहमंत्र्यांनी गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त हिमांशू रॉय यांना कळविले. त्यानंतर रॉय यांनी समाजसेवा शाखेचे वरिष्ठ निरीक्षक शिरीष सावंत आणि निरीक्षक संजय साळुंके यांच्यामार्फत छापा टाकत ५७ मुलींची सुटका केली. यामध्ये १७ अल्पवयीन मुली आढळून आल्या. या घटनेनंतर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा बार सुरू होता तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह काहीजणांना निलंबित करण्यात आले. नवी मुंबईत ठाणे ग्रामीणचे अधीक्षक अनिल कुंभारे यांनी तर ठाण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त फिरोज पटेल यांच्यामार्फत छापा टाकून कारवाई करण्यात आली.
राज्यात २००५ पासून डान्स बारवर बंदी घालण्यात आली आहे. बंदीच्या या निर्णयावर उच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले होते. मात्र काही तांत्रिक मुद्दे उपस्थित करीत सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठविली. त्यामुळे डान्स बार मालकांमध्ये उत्साह संचारला होता. परंतु नवीन परवान्यांसाठी तरतुदी इतक्या कडक करण्यात आल्या आहेत की, त्याची पूर्तता करणे शक्य नसल्याचे बार मालकांचे म्हणणे आहे. त्यातच ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्स बार सुरू होते. त्याविरुद्ध कारवाईही केली जात होती. आताही मुंबईसह ठाणे, नवी मुंबई असे प्रकार जोरात सुरू आहेत. त्यामुळे स्वत: गृहमंत्र्यांनी रस घेतला आहे.