संदीप आचार्य

क्षयरोग आणि कुष्ठरोगनिर्मूलनासाठी राज्य व राष्ट्रीय पातळीवर वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असताना क्षयरोग, कुष्ठरोग तसेच कर्करोग, उच्च रक्तदाब व मधुमेहाचे एकत्रित सर्वेक्षण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. २१ दिवस चालणाऱ्या या सर्वेक्षण मोहिमेत आरोग्य विभागाची तब्बल ७२ हजार पथके काम करत असून येत्या ५ ऑक्टोबपर्यंत ही मोहीम चालणार आहे.

आरोग्य विभागाच्या माध्यमातून आतापर्यंत क्षयरोग तसेच कुष्ठरुग्णांच्या सर्वेक्षणाच्या स्वतंत्रपणे मोहिमा आखल्या जात होत्या. तथापि राज्यात उच्च रक्तदाब व मधुमेहासारख्या असंसर्गजन्य आजारांचा तसेच वाढत्या कर्करोगासंदर्भात व्यापक जनजागृती होण्यासाठी एकत्रित सर्वेक्षण केल्यास उपचाराला गती देता येईल, अशी भूमिका आरोग्य विभागाच्या उच्चपदस्थ डॉक्टरांच्या बैठकीत घेण्यात आली. आरोग्य विभागातील उपलब्ध कर्मचारी व त्यांच्या कामाचे स्वरूप यांचा सखोल अभ्यास करून एकत्रित सर्वेक्षण करण्याचा निर्णय आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. या अंतर्गत सुमारे आठ कोटी ६६ लाख नागरिकांचे १३ सप्टेंबरपासून सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली. याच कालावधीत आशा कार्यकर्त्यांनी कामबंद आंदोलन पुकारल्यामुळे आरोग्य विभागाच्या परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले. १४ दिवसांत हे काम पूर्ण केले जाणार होते. तथापि आशा कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे याची मुदत वाढविण्यात आली असून ५ ऑक्टोबपर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले. या सर्वेक्षणासाठी सुमारे ३० कोटी रुपये खर्च येणार असून सर्वेक्षणाअंतर्गत लोकसंख्येच्या ०.४ टक्के एवढे रुग्ण शोधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

अशा प्रकारे रुग्ण शोधाचे उद्दिष्टही प्रथमच निश्चित करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. पद्मजा जोगीवार यांनी सांगितले. ज्या जिल्ह्य़ात कुष्ठरुग्णांचे प्रमाण अधिक आहे अशा  २२ जिल्ह्य़ांत २०१७-१८ मध्ये राबविलेल्या कुष्ठरोग शोध मोहिमेत साडेचार कोटी लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात ५,०७३ नवीन रुग्ण सापडले होते. अशाच प्रकारे क्षयरुग्ण शोधण्यासाठी राज्यात वेळोवेळी सर्वेक्षण करून एमडीआर व एक्सडीआरच्या रुग्णांची नोंदणी करण्यात आली. मात्र यासाठी वेगवेगळ्या सर्वेक्षण मोहिमा राबविण्यात आल्या होत्या. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यासाठी तसेच एकाच मोहिमेत असंसर्गजन्य आजारांचे रुग्ण शोधून त्यांच्यावरही उपचार करता यावेत यासाठी ही एकत्रित सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आल्याचे डॉ. पद्मजा जोगीवार यांनी सांगितले.