उत्तर प्रदेश दुसऱ्या, गुजरात तिसऱ्या क्रमांकावर

मुंबई : लशीच्या तुटवडय़ाचा सामना करीत महाराष्ट्राने लसीकरणातील आघाडी कायम ठेवली आहे. पहिली व दुसरी मात्र मिळून राज्यातील लसीकरणाची अडीच कोटींकडे वाटचाल सुरू आहे. त्या खालोखाल उत्तर प्रदेशात दोन कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. तिसऱ्या क्रमांकाचे लसीकरण गुजरातमध्ये झाले आहे.

लशींच्या तुटवडय़ामुळे देशभरच लसीकरण धिम्म्या गतीने सुरू आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या दैनंदिन अहवालातील नोंदीनुसार ७ जूनपर्यंत देशात २३ कोटी ६१ लाख ९८ हजार ७२६ नागरिकांना लस मात्र देण्यात आली. त्यात १८ कोटी ९५ लाख ७४७ पहिली लस मात्र घेणाऱ्या नागरिकांचा, तर ४ कोटी ६६ लाख २ हजार ९७९ दुहेरी लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांचा समावेश आहे. दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांची संख्याही देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अधिक आहे. राज्यात सोमवारी एका दिवसात सुमारे तीन लाख नागरिकांचे लसीकरण्यात आले. राजस्थानमध्ये १ कोटी ७८ लाख आणि कर्नाटकमध्ये १ कोटी ५४ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण  झाल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या खालोखाल लसीकरणात उत्तर प्रदेशचा दुसरा क्रमांक लागतो. या राज्यात २ कोटी७  लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यात पहिली मात्रा १ कोटी २० लाख ५५ हजार नागरिकांना देण्यात आली आहे. तर दोन्ही मात्र पूर्ण के लेल्या नागरिकांची संख्या ३६ लाखाच्या वर आहे.

गुजरात तिसऱ्या क्रमांकावर आहे, मात्र दोन्ही लस पूर्ण करण्यात महाराष्ट्रानंतर गुजरात राज्य पुढे आहे. या राज्यात एकू ण १ कोटी ८६ लाख ६४ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून त्यात दोन्ही लस मात्र घेणाऱ्या ४३ लाख २६ हजार नागरिकांचा समावेश आहे.

आकडेवारी..

महाराष्ट्रातील २ कोटी ४४ लाख ११ हजार २४८ नागरिकांना लस मात्रा देण्यात आली आहे. त्यात पहिली मात्र घेणाऱ्या नागरिकांची संख्या १ कोटी ९५ लाख ५९ हजार १९३ इतकी आहे. तर दोन्ही मात्रा पूर्ण के लेल्या नागरिकांची संख्या ४८ लाख ५२ हजार ५५ आहे.