देवनार कचराभूमीत लागलेल्या आगी प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई महापालिकेवर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली असून संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. तसेच या प्रकरणी संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल का करू नये, असा इशाराही या नोटिशीत देण्यात आला आहे.
देवनार कचराभूमीला गेल्या बुधवारी मध्यरात्रीनंतर लागलेली आग सोमवारी नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले; परंतु असे असले तरीही कचराभूमीतील कचऱ्याच्या ढिगातून मोठय़ा प्रमाणावर धूर येतच आहे. यामुळे प्रदूषणात भर पडत असून पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकाराची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सोमवारी गंभीर दखल घेत महापालिकेवर नोटीस बजावली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणी पालिकेच्या घनकचरा विभागातील कार्यकारी अभियंता आणि उपमुख्य अभियंता या दोघांना जबाबदार धरण्यात आले आहे.
देवनार कचराभूमीमध्ये यापूर्वी अनेक वेळा आग लागण्याच्या घटना घडल्या असून त्या त्या वेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेवर नोटीस बजावली आहे. गेल्या बुधवारी मध्यरात्रीपासून धुमसणाऱ्या कचराभूमीमुळे पर्यावरण आणि रहिवाशांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे कार्यकारी अभियंता आणि उपप्रमुख अभियंत्यांना या प्रकरणी जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, असे या नोटीसमध्ये स्पष्ट म्हटले आहे. पालिकेला सात दिवसांमध्ये या नोटीसला उत्तर द्यावे लागणार आहे.