27 February 2021

News Flash

मराठी चित्रपट आशयघन

व्यावसायिक यशाबरोबरच मराठी चित्रपटांनी आशयघनता टिकवली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी वरळी येथे केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संग्रहित छायाचित्र

मुख्यमंत्र्यांकडून कौतुक; राज कपूर जीवनगौरव पुरस्कार धर्मेद्र तर व्ही. शांताराम पुरस्कार विजय चव्हाण यांना प्रदान

व्यावसायिक यशाबरोबरच मराठी चित्रपटांनी आशयघनता टिकवली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी वरळी येथे केले. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाने नॅशनल स्पोर्टस् क्लब येथे आयोजित केलेल्या  ५५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी आणि राज्य शासनातर्फे देण्यात आलेल्या विविध पुरस्कारांचे पुरस्कार्थी  मंचावर उपस्थित होते.

राज्य शासनाचा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार अभिनेते जितेंद्र यांच्या हस्ते अभिनेते धर्मेंद्र यांना प्रदान करण्यात आला.  तर व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार अभिनेते विजय चव्हाण यांना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप प्रत्येकी पाच लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे आहे. या वेळी राजकपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते राजकुमार हिरानी यांना तर व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री— दिग्दर्शिका मृणाल देव— कुलकर्णी यांना संगीतकार अजय—अतुल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप प्रत्येकी तीन लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे आहे.

आपले मनोगत व्यक्त करताना धर्मेंद्र म्हणाले, ‘रसिकांच्या प्रेमामुळे गेली साठ वर्षे मी हिंदी चित्रपटसृष्टीत टिकून आहे. पंजाबी शेतकऱ्याच्या मुलाला महाराष्ट्रानेही आपले म्हटले आणि प्रेम दिले. त्यासाठी मी महाराष्ट्राचा ॠणी असून महाराष्ट्र ही माझी दुसरी आईच आहे’.

विजय चव्हाण, मृणाल देव, राजकुमार हिरानी यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.

रेडूसर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘रेडू’ सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. तर द्वितीय आणि तृतीय पुरस्कार अनुक्रमे ‘मुरांबा’  आणि ‘क्षितीज’  या चित्रपटांना मिळाला. ‘मंत्र’ हा सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट तर ‘इडक’ हा सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट ठरला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ‘रेडू’ या चित्रपटासाठी शशांक शेंडे यांना तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार पूजा सावंत यांना ‘भेटलीस तू नव्याने’ या चित्रपटासाठी प्रदान करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2018 4:33 am

Web Title: maharashtra state marathi film awards 2018 cm devendra fadnavis
Next Stories
1 रेल्वे कचराग्रस्त!
2 दहिसरमध्ये ५२ सोसायटय़ांत कचऱ्यापासून खतनिर्मिती
3 महापालिकेच्या घरांची परस्पर विक्री करणाऱ्यांविरोधात वर्षभरानंतर गुन्हा
Just Now!
X