देखभालीअभावी जुने १०० किओस्क धूळ खात
‘डेक्कन ओडिसी’ या विशेष पर्यटन ट्रेनची व्यवस्था तब्बल तीन वर्षे सांभाळल्यानंतर त्यापोटी पर्यटन महामंडळाला देय असलेली १७ कोटींची रक्कम थकविणाऱ्या कंत्राटाराविरुद्ध एकीकडे कारवाई सुरू करण्यात आलेली असताना आता महामंडळासाठी नव्याने किओस्क खरेदी करण्यात येणार आहेत. यापूर्वी खरेदी केलेले १०० किओस्क न वापरताच पडून असल्याची बाबही पुढे आली आहे.
महामंडळासाठी सुमारे १०० किओस्क खरेदी करण्याचे कंत्राट मे. फोर्बस् टेक्नोसिस लि. या कंपनीला नोव्हेंबर २०१२ मध्ये देण्यात आले होते. सुमारे सव्वा लाख रुपये प्रति किओस्कप्रमाणे हे सव्वा कोटींचे कंत्राट जारी करण्यात आले. या किओस्कमध्ये स्वतंत्र सॉफ्टवेअर विकासासाठी प्रति माणशी ७५ हजार रुपये प्रत्येक महिन्याला देण्याचे निश्चित करण्यात आले होते. याशिवाय प्रत्येक किओस्कमागे ८०० रुपये अशा रीतीने दहा लाख रुपये कंत्राटदाराला देऊ करण्यात आले होते. परंतु आता हे सर्व किओस्क धुळ खात पडले आहेत. अशावेळी आता नव्याने किओस्क खरेदी करण्यात येणार आहेत. पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन यांनी त्यास दुजोरा दिला. मात्र हे किओस्क हे चांगल्या गुणवत्तेचे असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या पूर्वी पुरविण्यात आलेल्या किओस्कद्वारे पर्यटन मंडळाच्या अतिथिगृहांची ऑनलाईन नोंदणी करण्याची तसेच रेल्वे आरक्षणाचीही सोय उपलब्ध करून देण्याची प्रमुख अट होती. परंतु ती अट पूर्ण करण्यात आली नाही, असा आरोप पर्यटन महामंडळ कर्मचारी संघटनेचे दिलीप आजगावकर यांनी केला आहे. आता पुन्हा नव्याने किओस्क खरेदी करण्याचे प्रस्तावीत असले तरी हे किओस्क नीट चालतील, त्याचा पर्यटकांना खरोखरच फायदा होईल याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. किओस्कवर पर्यटन मंडळाच्या अतिथिगृहांची नोंदणी करण्याची व्यवस्था करून देणे हे महागडे ठरू शकते. रेल्वे आरक्षणाबाबत आपल्याला कल्पना नाही, असेही जैन यांनी स्पष्ट केले.

पूर्वी घेण्यात आलेले किओस्क कार्यरत आहेत किंवा नाही याची माहिती आपण घेऊ. या किओस्क पुरवठादारांना कुठल्या अटी घालण्यात आल्या होत्या, याची आपल्याला कल्पना नाही. परंतु पर्यटकांना तात्काळ माहिती उपलब्ध व्हावी यासाठी किओस्क उपयोगी ठरतात
– पराग जैन,
व्यवस्थापकीय, संचालक, महाराष्ट्र पर्यटन महामंडळ