मध्य प्रदेशात काली माचक नदीवरील रेल्वेमार्ग वाहून गेल्याने दोन गाडय़ांचे काही डबे पडून जीवित हानी झाल्याच्या पाश्र्वभूमीवर आता मुंबईतील उपनगरीय रेल्वेवरही अशाच प्रकारच्या अपघाताची शक्यता व्यक्त होत आहे.

मध्य रेल्वेवर दिवा-कोपर या स्थानकांदरम्यानच्या खाडीतून गेल्या काही वर्षांत प्रचंड वाळू उपसा करण्यात आला आहे. तसेच येथील तिवरांच्या झाडांचीही बेसुमार कत्तल झाल्याने खाडीचे पाणी थेट रेल्वेमार्गापर्यंत पोहोचत आहे. रेल्वे प्रशासन या दलदलीच्या भागात संरक्षक भिंत उभारत असले, तरी वेगाने चाललेला हा बेकायदेशीर वाळू उपसा प्रवाशांच्या जिवावर बेतण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाला या बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.  मध्य रेल्वेवर कळवा-मुंब्रा-दिवा-डोंबिवली आणि ठाकुर्ली-कल्याण या स्थानकांदरम्यान रेल्वेमार्ग खाडीच्या बाजूला आहे. यापूर्वी रेल्वेमार्ग आणि खाडी यांमध्ये तिवरांची दाट झाडी होती. २६ जुलै २००५च्या अपवादात्मक पूर परिस्थितीत या रेल्वेमार्गाखालची जमीन वाहून गेल्याने येथील वाहतूक बंद पडली होती. ही घटना वगळता इतर वेळी प्रचंड पावसातही केवळ तिवरांच्या दाट झाडीमुळे रेल्वेमार्गापर्यंत पाणी पोहोचणे अवघड असल्याने रेल्वेमार्ग सुरक्षित होते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये येथे बेकायदेशीररीत्या वाळू उपसा करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यासाठी येथील तिवरांच्या झाडांची बेसुमार कत्तल झाली आहे. त्यामुळे हा परिसर ओकाबोका झाला असून खाडीच्या पात्राची खोलीही वाढली आहे. मात्र तिवरांची झाडे नसल्याने आता खाडीचे पाणी थेट कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या मार्गापर्यंत पोहोचले आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यास किंवा पाऊस पडतानाच भरती आल्यास खाडीचे पाणी वाढून त्यात रुळांखालची जमीन आणि खडी वाहून जाण्याची शक्यता आहे. अशी घटना घडल्यास उपनगरीय रेल्वेसेवेला आणि प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसू शकतो आणि मोठी जीवित हानी होऊ शकते. येथे पोहोचण्यासाठी रस्ता नसल्याने बचावकार्य करणेही कठीण होण्याची शक्यता आहे.