मालवणीच्या विषारी दारूकांडातील मुख्य आरोपीला गुन्हे शाखेने गुजरातमधून अटक केली आहे. भरत पटेल असे या आरोपीचे नाव असून अटकेमुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या १४ झाली आहे. जून महिन्यात मालवणी येथे हातभट्टीची दारू सांगून मिथेनॉल हे रसायन विकल्याने १०४ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेने स्थानिक दारूविक्रेत्यांसह रसायनाचा पुरवठा करणाऱ्यांना अटक केली होती. भरत पटेल (४२) हा आरोपी गुजरातमधून रसायनाची तस्करी करून विकत होता. त्याने पुरविलेल्या रसायनामुळे गुजरातमध्ये यापूर्वीही विषबाधा झाली होती. त्या प्रकरणी त्याला अटकही झाली होती. तो हे रसायन यापूर्वी अटक करण्यात आलेल्या सुभाष गिरीला विकत होता. तेथून ते आतिक खान हा आरोपी मुंबईत आणून विकत होता. भरत पटेल याला १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून त्याच्या अन्य दोन फरार साथीदारांचा शोध सुरू आहे.